पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड, कारवर टाकले सिमेंट ब्लॉक : कुठे घडलाय प्रकार ?

शेअर करा

कोरोना संसर्गामुळे पुणे शहरासह राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशातही पुण्यातील गुन्हेगारी काही थांबताना दिसत नाही. बिबवेवाडी परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. हा प्रकार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पूर्ववैमनस्यातून वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न नुकताच झाला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 19 वर्षीय रणजीत राजू सावंत आणि 21 वर्षीय आदेश राजेंद्र गोरड अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं असून दोघेही अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी परिसरातील रहिवासी आहेत.

दोघांच्या साथीदारांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजीव गांधी नगरमध्ये राहणाऱ्या पंढरीनाथ दारवटकर यांनी फिर्याद दिली होती. आरोपी सावंत, गोरड आणि त्यांचे साथीदार दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी राजीव गांधी नगर परिसरातील दत्त मंदिर चाळीत आले होते. त्यांनी स्थानिक रहिवाशांना शिवीगाळ केली. तसेच हातातील काठ्या, सिमेंटचे गट्टू वाहनांवर फेकले. नागरिकांना दमदाटी करुन आरोपी पसार झाले होते.

सराईत गुन्हेगाराच्या हत्येनंतर अंत्यविधीला बाईक रॅली आणि तरुणावरील टोळक्याच्या कोयता हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच वाहनांची तोडफोड झाल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना अनेकदा डोकं वर काढत असतात. बिबवेवाडी परिसरात पुन्हा एकदा हे सत्र सुरु झाल्याची भीती आहे.


शेअर करा