३० जूननंतर लॉकडाउन उठणार का ? , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

शेअर करा

लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मिशन बिगनची सुरुवात केली आहे. मात्र शक्य असल्यास घरीच राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे . आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आपण कात्रीत सापडलो आहोत अशी कबुली देखील दिली .

राज्यातील लॉकडाउन 30 जुनपर्यंत असून पुढे काय, असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला होता. राज्यात टप्प्या-टप्प्याने अनलॉक होत आहे, मात्र अद्यापही जिल्हाबंदी कायम आहे. त्यातच, एसटी महामंडळाकडून बससेवा सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे, जुलै महिन्यातील अनलॉकमध्ये आणखी काय शिथिलता मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनेतशी संवाद साधत कोरोनाविरुद्धची पुढील रणनिती सांगताना 30 जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, असे स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे .

ते म्हणाले, ” मी लॉकडाऊन हा शब्द वापरणार नाही. पण स्पष्ट सांगायचं झालं तर ३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही. पण काही गोष्टी आपण हळूहळू शिथिल करणार आहोत, असं सांगतानाच काही गोष्टी शिथिल करणार याचा अर्थ लगेच येत्या १ तारखेपासून सर्व काही अलबेल झालं अशा भ्रमात राहू नका. कुठेही गर्दी करू नका. ज्या भागात गर्दी होईल, त्या भागात पुन्हा पूर्वीसारखाच कडक लॉकडाऊन करण्यात येईल “

राज्य सरकार कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून जगात सुरू असलेल्या अत्याधुनिक पद्धतींचा वापर केला जात आहे. कोरोना संकटाचा सामना करताना अनेक नवनव्या औषधांची नावं पुढे येत आहेत. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, रेमडेसिवीर अशा औषधांचा वापर जगभरात होत आहे मात्र यामध्ये महाराष्ट्र कुठेही मागे नाही. कोरोना रुग्णांसाठी सध्या जगभरात प्लाज्मा पद्धती वापरण्यात येत आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाज्माच्या मदतीनं ९० टक्के कोरोना रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी पुढे यावं आणि प्लाज्मा दान करावा. कोरोना संकट येताच सुरुवातीला मी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला राज्यातल्या जनतेनं मोठा प्रतिसाद दिला. रक्ताचा तुटवडा दूर झाला. त्याचप्रकारे प्लाज्मा दान करण्याच्या आवाहनालाही प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

अद्यापही मुंबई, पुणे, सोलापूर या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, कोरोनावर मात करत नेमकं कसं जगायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप काळजी घेणे गरजेचं आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण मिशन बिगेन अगेन सुरु केल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात प्रशासन आणि सरकारने केलेल्या कामाचं कौतुक केलं. तसेच, कमीत कमी जिवितहानी आणि जनावरांचे जीव वाचवण्यात आपण यशस्वी ठरल्याचे सांगितले. येत्या, 1 तारखेला आषाढी एकादशी असून राष्ट्रीय डॉक्टर दिवस आहे, त्याबद्दल सर्व डॉक्टरांचे अभिनंदन आणि आभारही मी मानत असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले. महाराष्ट्रावरील संकट टळावे म्हणून विठुरायाला देखील मुख्यमंत्री म्हणून नव्हेतर तुमचा प्रतिनिधी म्हणून साकडे घालणार असल्याचे देखील ते पुढे म्हणाले.

ज्या शेतकऱ्यांवर दुपार पेरणीचे संकट आलेले आहे आणि त्यांना फसवणारे जे काही असतील त्यांना सोडणार नाही .आपलं सरकार काळजी वाहू नाही तर महाराष्ट्राची काळजी घेणारं सरकार आहे. धोक्यापासून सावध करणारं सरकार आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना देखील विश्वास दिला आहे ..


शेअर करा