रेखा जरे हत्याकांड प्रकरणाचा सूत्रधार बाळ बोठेचा तुरुंगात आणखी ‘ असाही ‘ कारनामा

शेअर करा

अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare Murder Case) हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे (Bal Bothe) याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. कारागृहात बोठेकडून मोबाईलचा वापर होत असल्याचं उघडकीस आलं आहे. बाळ बोठे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पोलिसांनी मार्च महिन्यात हैदराबादमधून अटक केली होती. रेखा जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता. अहमदनगरमधील पारनेर कारागृहात काही दिवसांपूर्वी पोलिसांना मोबाईल सापडले होते. त्या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली असता कैदी बाळ बोठेनेही मोबाईल वापरल्याचे समोर आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जातेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेत घातपाताचा देखील संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता तसेच घडलेले कारण हे तात्कालिक नसावे तर हा पुर्ननियोजीत कट असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती आणि अखेर ती खरी ठरली.

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरे यांच्यासोबत त्याच्या आई आणि लहान मुलगा होता. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली होती.

रेखा जरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे जरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बोठे देखील हजर होता तेव्हापासूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. दरम्यान याच गुन्ह्यातील इतर आरोपीना अटक होताच बोठे फरार झाला . दरम्यान या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला होता . लवकरात लवकर बोठे यास अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते मात्र त्यानंतर त्याला अटक करण्यात आले .

नगर पोलिसांनी अशी केली होती कारवाई ?

नगर येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे (रा. बालिकाश्रम रोड सावेडी, नगर) हा हैद्राबादमधील बिलालनगर या गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या भागात लपून बसला होता. गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या तेथील एका वकिलानेच त्याला यासाठी मदत केली होती. शेवटी नगरच्या पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याच्यासह मदत करणाऱ्या आरोपींनाही अटक केली होती. आधुनिक तंत्रज्ञानाची चांगलीच माहिती असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत होता.

३० नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या झाली होती. गुन्ह्यात नाव आल्यापासून बोठे फरार झाला. काही दिवस इतत्र राहिल्यानंतर याने हैदराबाद गाठले. पूर्वी त्याने याच भागातील उस्मानिया विद्यापाठातून पीचएडी मिळविलेली आहे. त्यावेळी तेथील जर्नादन अकुला चंद्राप्पा (रा. सारोमानगर, रंगारेड्डी, हैद्राबाद, तेलंगाना) या वकीलाशी त्याची ओळख झाली होती. गुन्हेगारांना मदत करण्यासाठी हा वकील परिसरात फेमस आहे.

बाळ बोठे याने मदत हवी म्हणून वकिलांकडे याचना केली. पोलिसांना पक्की खबर मिळाली तेव्हा पोलिस याच भागातील प्रतिभानगर परिसरातील एका हॉटेलवर गेले. त्यातील रूम नंबर १०९ मध्ये बोठे लपून बसल्याची माहिती पोलिसांना होती. मात्र, रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी बोठे याने तेथे बी. बी. पाटील या नावाने बुकिंग केलेले होते. ओळख लपविण्यासाठी तो दाढी वाढवून आणि वेष बदलून वावरत होता. मात्र, तो तेथेच असल्याची माहिती पक्की असल्याने पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि बोठे पकडला गेला.

बाळ बोठे याला पकडले त्यावेळी तो रूममध्ये एकटाच होता. त्याला मदत करणारा चंद्राप्पा, राजशेखर अंजय चाकाली (वय २५ रा. गुडुर करीम नगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय ३० रा. बालापुर, सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (वय ५२, रा. चारमीनार मस्जीद, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश) यांनाही अटक करण्यात आली होती.

बाळ बोठे हैद्राबादमध्ये असला तरी तिथून नगरमध्ये काय चाललंय ? याची सगळी माहिती घेत होता. बोठे याला नगरमधून मदत करणारा महेश वसंतराव तनपुरे (वय ४०, रा. कुलस्वामीनी गजानन हौसिंग सोसायटी, नवले नगर, गुलमोहर रोड, नगर) याला देखील अटक करण्यात आली होती . तनपुरे हा बोठेशी नगरमधून संपर्कात राहत होता व येथून मदत करीत होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

बोठे याच्या खोलीतून काही मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. फरार असल्याच्या काळात त्याने अनेक मोबाईल वापरले. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांत सुमारे शंभरहून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबविली. हैदराबादमध्ये तीन दिवसांपासून कारवाई सुरू होती. तेथेही तीन ठिकाणांहून पोलिस पोहचण्यापूर्वी पळून जाण्यात तो यशस्वी झाला होता. आपली ओळख लपविण्यासाठी त्याने दाढी वाढविली होती . वेषांतर केले होते तसेच तो बी. बी. पाटील या नावाने वावरत होता.

आरोपी सागर भिंगारदिवे याच्यामार्फत बाळ बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानंतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारेही जरे यांच्या हत्येचा बोठे हाच सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते . मधल्या काळात त्याने अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयातही तो फेटाळण्यात आला. मधल्या काळात पोलिसांनी त्याला फरार घोषित केले. पारनेर येथील न्यायालयाने त्याला फरार घोषित करून ९ एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्याआधीच त्याला अटक झाली.

पोलिसांची पाच पथके बाळ बोठे याचा शोध घेत होती. पोलिसांनी रेखा जरे यांच्या घराची,तसेच या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे व बोठे याच्या घराची झाडाझडती घेतली होती आणि काही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली होती . नगरसह अन्य ठिकाणी आतापर्यंत दहापेक्षा जास्त ठिकाणी पोलिसांना शोध घेतला होता . विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या झडतीमध्ये महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते .

टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, बाळ बोठे याने काही दिवसापूर्वी नगर इथे हनी ट्रॅपचे रॅकेट कसे कार्यरत आहे याबदल एक मालिका छापली होती. त्या मालिकेत कसे धनदांडगे सावज हेरून जाळ्यात ओढले जाते आणि नंतर माहितीतील पोलिसांची मदत घेत धाड घालून कशा पद्धतीने ‘ मांडवली ‘ केली जाते याचा लेखाजोखा देखील दिला होता, अर्थात ही माहिती बोठे यांच्यापर्यंत कशी पोहचत होती हे मात्र गूढ आता बोठे ताब्यात आल्याने उकलण्यात येईल का ? याचे उत्तर नगरकरांना आता हवे आहे .


शेअर करा