बोंबला..आधी नर्सने पळवलं आणि बळजबरीने लावलं लग्न : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

लग्नाला तयार नसलेल्या प्रेयसीचे अपहरण करुन तिच्यासोबत लग्न केल्याचा प्रकार अनेकदा चित्रपटापासून ते वास्तवातही पाहायला मिळतो. मात्र एका प्रेयसीने आपल्या दोन मित्रांच्या सहाय्याने चक्क प्रियकराचे अपहरण करुन लग्न थाटल्याचा प्रकार अमरावतीत समोर आला आहे. व्यवसायाने औषध विक्रेता (एमआर) असलेल्या प्रशांत (काल्पनिक नाव, २८ वर्ष) नामक युवक आणि नर्स युवती हे दोघेही मूळचे वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे एकमेकांवर मागील पाच वर्षांपासून लग्न न करण्याच्या अटीवर प्रेमसंबंध होते. ( girlfriend abducted boyfriend for marriage in Amravati )

८ जानेवारी २०२१ रोजी रात्री प्रेयसी असलेल्या नर्सने प्रशांतच्या घरी अजय वानखडे (रा. अकोला) याच्यासह दोन युवकांना पाठवून त्याला जबरीने पंचवटी चौक परिसरात दुचाकीवर बसवून आणले. तेव्हा नर्सने प्रशांतला आताच्या आता माझ्यासोबत लग्न कर, असा आग्रह धरला. प्रशांतने नकार देताच सोबतच्या दोन युवकांनी त्याला मारहाण सुरू केली. त्यानंतर या टोळीने प्रशांतला जबरदस्तीने शहरातील वडाळी परिसरात नेले. त्या ठिकाणी अजय वानखडे व त्याच्या सहकाऱ्यांनी मारहाण करुन रात्रभर एका ठिकाणी डांबून ठेवले.

हे प्रकरण मिटवायचे असेल तर आताच दोन लाख रुपये आणि दोन स्टॅम्प पेपर बोलावून घे, अशी धमकी दिली. त्यामुळे प्रशांतने त्याच्या दोन मित्रांना सांगून ९ जानेवारीला सकाळी दोन कोरे स्टॅम्प पेपर आणि एक लाख रुपये घेऊन बोलावले. ही रक्कम नर्स व तिच्या दोन मित्रांना दिल्यानंतर त्यांनी प्रशांतला सांगितले की, तुला जर या प्रकरणातून स्वत:ची सुटका करायची असेल तर नर्सच्या गळ्यात हार घालण्याचे म्हणजेच लग्न करण्याचे नाटक करावे लागेल. त्यावेळी धमकावून मला लग्न करायला लावले, असे प्रशांतने तक्रारीत नमूद केलं आहे.

हार घालण्यावेळीचे फोटोही अजय वानखडे याने काढले. तसंच त्यानंतर कोऱ्या स्टॅम्प पेपरवर प्रशांतच्या सह्या घेतल्या आणि त्याला धमकी देऊन त्या ठिकाणाहून सोडून दिले. तसेच आणखी पाच लाख रुपयांची तातडीने व्यवस्था कर, अशी धमकी देवून आणखी खंडणी मागितली. ही खंडणी दिली तरंच लग्न केल्याचे हे पुरावे फाडून टाकू आणि तू जर या प्रकाराबाबत कोणाजवळही सांगितलं तर तुला मारुन टाकू, अशी धमकी देण्यात आली.

प्रशांतच्या तक्रारीवरुन बुधवारी राजापेठ पोलिसांनी प्रशांतची प्रेयसी असलेली नर्स, आकाश वानखडे व आकाशसोबत असलेल्या युवकांविरुद्ध धमकी देणे, अपहरण करुन खंडणी मागणे, मारहाण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. महिलेच्या अशा वागण्या पाठीमागे इतरही काही कारणे आहेत का ? याचाही पोलीस शोध घेत आहेत .


शेअर करा