फॅक्ट चेक : मोहरीचं तेल आणि सैंधव मीठाने म्युकोरमायकोसिस बरा होतो का ?

शेअर करा

देशात सध्या कोरोना आणि म्युकोरमायकोसिस या दोन आजारांनी थैमान घातलं आहे. आतापर्यंत अनेक जणांना या विषाणूमुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर असंख्य जण अद्यापही या विषाणूविरोधात लढा देत आहेत. त्यामुळे सध्या उद्भवलेल्या या गंभीर परिस्थितीमध्ये आपण आपली व कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यातच सोशल मीडियावर अनेक घरगुती उपाय करण्याविषयीची माहिती व्हायरल होत आहे.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अनेक जण या माहितीची सत्यता न पडताळता थेट उपायदेखील करु लागले आहेत त्यामुळे सरकारची डोकेदुखी आणखीनच वाढत आहेत. यामध्येच गेल्या काही दिवसांपासून तुरटी, हळद, सैंधव मीठ आणि मोहरीचं तेल यांच्या एकत्रित मिश्रणामुळे म्युकोरमायकोसिसचा प्रादुर्भाव कमी होतो अशी माहिती व्हायरल होत आहे. परंत ही माहिती खोटी असल्याचं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ( PIB) या संस्थेने स्पष्ट केलं असून त्यासंदर्भात ट्विट केले आहे .

“म्युकोरमायकोसिसवर तुरटी, हळद, सैंधव मीठ आणि मोहरीचं तेल गुणकारी ठरत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा दावा खोटा असून ही माहिती फेक आहे. या घरगुती उपायामुळे म्युकोरमायकोसिस बरा होतो असा दावा कोणत्याही वैज्ञानिकांनी केलेला नाही किंवा तसं वैद्यकीय प्रमाणपत्रही नाही. त्यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेऊ नका”, असं ट्विट पीआयबीने केलं आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर दररोज असंख्य घरगुती उपाय सांगणारे मेसेज व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक जण मेसेजची सत्यता न पडताळता केवळ घरगुती उपाय म्हणून हे प्रयोग करत आहेत. मात्र, अशा फेक मेसेजवर विश्वास ठेऊ नका. हे उपाय शरीरासाठी अत्यंत घातक असल्याचं वारंवार आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.

कोरोनानंतर आता गुजरातमध्ये म्यूकरमायकोसिसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुजरातच्या सूरत येथे असाच एक भयानक प्रकार समोर आला आहे. ज्यानं डॉक्टर देखील चक्रावले आहेत. एका २३ वर्षीय तरुणाला कोणतेही लक्षण नसूनही त्याच्या डोक्यात काळ्या बुरशीची लागण झाल्याचं दिसून आलं. धक्कादायक बाब अशी की सुरुवातीला मेंदूत एक सामान्य गाठ आल्यानं सूज आल्याचं दिसून आलं होतं. पण काही कालावधीनंतर ती गाठ नसून म्यूकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशीची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आणि काही कालावधीतच त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला .

सूरत येथील कोसम्बा परिसरात राहणाऱ्या या २३ वर्षीय तरुणाला २८ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ४ मे रोजी कोरोनावर मात करुन तो घरी परतला होता. पण ८ मे रोजी त्याला बेशुद्ध अवस्थेत पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी सूरत येथील सिम्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. प्राथमिक चाचण्यानंतर त्याच्या डोक्यात सामान्य स्वरुपाची गाठ असल्यानं सूज आल्याचं दिसून आलं होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला त्याच्यात म्यूकरमायकोसिसची कोणतीही लक्षण दिसून आली नव्हती.

शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर दोन दिवस त्याची प्रकृती स्थित होती. पण त्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली आणि हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झालं. डॉक्टरांनी त्याच्या बायोस्पी चाचणीसाठी काही नमुने पाठवले होते. त्याचे रिपोर्ट पाहून डॉक्टर देखील हैराण झाले. या रिपोर्टमध्ये तरुणाला म्यूकरमायकोसिसची लागण झाल्याचं समोर आलं होतं. महत्वाची बाब अशी म्यूकरमायकोसिस तिसऱ्या स्टेजमध्ये मस्तकापर्यंत पोहोचतो.

काळ्या बुरशीचा आजार दिवसेंदिवस वाढत असल्यानं अनेक राज्यांनी या रोगाला महामारी म्हणून घोषीत केलं आहे. त्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात तयारी देखील करत आहे. पण सूरतमधील या प्रकरणानं सर्वांच्या चिंतेत भर टाकली आहे. लक्षण नसतानाही रुग्ण म्यूकरमायकोसिसच्या तिसऱ्या स्टेजपर्यंत पोहोचल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात असून कोरोनापाठोपाठ म्यूकरमायकोसिसने देखील सरकारची चिंता वाढवली आहे .

म्युकरमायकोसिस म्हणजे काय ?

म्युकरमायकोसिस दुर्मिळ असला, तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या, तसंच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस होणं तसंच त्यामुळे त्यांचा मृत्यू होणं अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. पण कोविड-19 मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे, असं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. कोविड-19 मधून चांगल्या पद्धतीनं बरं होत असलेल्या पेशंट्सना याची लागण होण्यामध्ये अचानक वेगाने वाढ होणं ही काळजीची बाब असल्याचं सांगितलं जात आहे.

म्यूकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, या आजारासाठीचे १४ इंजेक्शन घ्यावे लागतात. या इंजेक्शनचे दर महाग असल्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या आवाक्याबाहेर खर्च जात आहे. त्यामुळे या आजारावरील उपचार जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे .

कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो तेव्हा त्या ऑक्सिजनमधील पाणी शुध्द ( डिस्टिल्ड )असले पाहिजे. पाणी शुद्ध नसल्यास देखील हा बुरशीजन्य आजार म्हणजेच म्युकरमायकोसिसची लागण होते. शुध्द पाण्याची जबाबदारी ही त्या त्या हॉस्पिटलवर देणे अत्यंत गरजेचे आहे कारण वेळीच उपाययोजना न केल्यास म्युकरमायकोसिसचे आणखी एक संकट उभे राहू शकते, ह्या आजारात मृत्यूचे प्रमाण ५० टक्केहुन जास्त आहे. मात्र वेळेत उपचार सुरु केल्यास आजार बरा देखील होऊ शकतो .

म्युकरमायकोसिसची लक्षणे ही नाक, ओठाजवळ काळे डाग पडतात. हे डाग दिसल्यास तात्काळ उपचार सुरु केले पाहिजेत. हा आजार मेंदू तसेच डोळ्यांना इजा पोहचवू शकतो. या आजारावरील औषधी म्हणजेच एमपी- एंपोथेरिसीन सर्वत्र उपलब्ध आहेत. मागणी वाढल्यामुळे या औषधाच्या किंमती अडीच हजार रूपयांवरून थेट सहा हजार रूपयांवर पोहचल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही. ही बाब लक्षात घेऊन लवकरच हे १४ डोस लागणाऱ्या इंजेक्शनचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत केला जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.


शेअर करा