देशात दुसरी लाट म्हणजे मोदींची लोकप्रियता संपवण्यासाठी चीनचा कट

शेअर करा

देशात कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरलेले भाजप सरकार कोरोनाचे अपयश दुसरीकडे वळवण्याचे प्रयत्न सातत्याने करत आहेत .भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय यांनी भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी चीन जबाबदार असल्याचा दावा केला आहे. अर्थात अशी विधाने करण्याची विजयवर्गीय यांची काही पहिलीच वेळ नाही .

विजयवर्गीय यांनी म्हटलं की, भारतात दुसरी लाट आली की पाठवली ही विचार करण्याची गोष्ट आहे. मला वाटतं की, हे चीनचं व्हायरल वॉर आहे. कारण फक्त भारतातच दुसरी लाट दिसली आहे. इतर शेजारी देशांमध्ये दुसऱ्या लाटेचा परिणाम दिसत नाही. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, भूतान या देशांमध्ये दुसरी लाट आलेली नाही. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता संपवण्यासाठी हा कट रचला असल्याचंही कैलास विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.

कैलास विजयवर्गीय म्हणाले की, जगात भारतानेच चीनला आव्हान दिलं आहे. त्यामुळे दुसरी लाट भारतात पाठवली असण्याची शक्यता आहे. देशात दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासली. तेव्हा मोदींनी सर्व सुविधांसाठी जगभरातून ऑक्सिजन मागवला. देशातील तिन्ही दलांनी यामध्ये मोठी भूमिका बजावली. सुरुवातीच्या आठवड्याभरात ऑक्सिजनसाठी देशातील नागरिक त्रासले होते. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला.

चीनने व्हायरल वार भारतावर केला आहे. अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. काही दिवसांपूर्वी मला एका काँग्रेस नेत्याचा फोन आला. त्यांनी माझ्याकडून ऑक्सिजनची मशिन्स मागितली. जितके शक्य झाले तितके पोहोचवल्याचं विजयवर्गीय यांनी सांगितले.

विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. काँग्रेस आमदार कुणाल चौधरी यांनी सांगितलं की, जेव्हा देश कोरोनाशी लढत होता तेव्हा पश्चिम बंगालमधील निवडणूक सुरु होती. जगात दुसरी लाट आली तेव्हा त्यांनी तयारी केली होती. मात्र आपण काहीच तयारी केली नाही. त्यामुळे देशात इतकी भयंकर परिस्थिती ओढावली.


शेअर करा