शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या वेशीवर सुरु केलेल्या आंदोलनास बुधवारी ( ता. 26) मे सहा महिने पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारच्यावतीने शेतकरी आंदोलनाची उपेक्षा केली जात आहे. त्याच प्रमाणे ३८ कामगार हक्काचे कायदे मोडीत काढून कामगार वर्गावर कुऱ्हाड चालविली आहे. कोरोना महामारीचा गैरफायदा घेत कामगार व शेतकऱ्यावर अन्यायकारक कायदे लादले जात आहेत असे आरोप करत भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली परभणीत करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदीच्या भाजपा सरकारने लसीकरणासाठी ठोस पावले न उचलता केवळ बढाईखोरपणा चालवून देशातील जनतेला कोरोना महामारीमध्ये संकटात लोटले आहे असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. शेतकरी विरोधी व कामगार विरोधी कायदे तत्काळ रद्द करा परभणी जिल्ह्यातील तीन खाजगी बाजार समित्यासह महाराष्ट्रातील 137 खाजगी बाजारसमित्या तत्काळ रद्द करा, तातडीने १००% लसीकरण केंद्र शासनाच्या वतीने राबवा सर्व हमाल व कामगार यांना तत्काळ लसीकरण करा आणि ५० लाख विमा कवच लागू करा, गुन्हेगारी निष्काळजीपणामुळे झालेल्या रुग्ण मृत्यू प्रकरणी न्यायालयीन आयोग नेमण्यात यावा.
परभणी जिल्ह्यातील कोविड केंद्रातील गैरप्रकार या बद्दल कठोर कारवाई करा, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2020 हंगामातील अतिवृष्टीमुळे बाधित पिकांना ता. 5 मार्च 2021 च्या कृषी आयुक्त परिपत्रकानुसार पीक विमा भरपाई अदा करा. रब्बी 2018 मधील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची मंजूर पीक विमा भरपाई अदा करा, सर्व जॉबकार्ड धारक मजुरांना रु ७५०० प्रती माह कोविड लॉक डाऊन मदत करा, रोहयो कामे उपलब्ध करा मागणी करून काम न दिल्या प्रकरणी बेरोजगार भत्ता द्या, घरकुल योजनेसाठी मोफत वाळू द्या, लॉक डाऊन काळातील वीजबिल घरपट्टी माफ करा, सर्व शेतकऱ्यांना एकरी रु ४० हजार पीककर्ज उपलब्ध करा त्या साठी बँकिंग कामाची वेळ वाढवा आणि बँक तुमच्या दारी योजना राबवा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक पीक कर्जवाटप किमान २८० कोटी करा, खते बियाणे व औषधी दरवाढ रद्द करा, सर्व नॉन बॅंकिंग फायनान्स कंपन्यांच्या वाहन कर्ज गृह कर्ज या सह सर्व प्रकारच्या कर्ज वसुलीस स्थगिती द्या या सह अनेक मागण्यांचा समावेश आहे.
परभणी जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत परवाना धारक हमाल कामगारांना २ क्विंटल धान्य वाटप करा, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील बोगस मतदारांची नावे तत्काळ रद्दबादल करा या मागण्यासाठी बुधवारी (ता. २६) काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच केंद्र शासन व पंतप्रधानाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात राजन क्षीरसागर, शेख अब्दुल, लक्ष्मण काळे, प्रकाश गोरे, सय्यद अझहर, उद्धव देशमुख आदी सहभागी झाले होते.