लाच म्हणून पैसे नको मटण अन क्वार्टर दे , हाडूक चघळतानाच अधिकारी धरला

शेअर करा

कायदे कितीही कडक केले तरी सरकारी कर्मचारी भ्रष्टाचार करण्याच्या नवनवीन क्लुप्त्या शोधून काढत असतात. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आली आहे . फ्लॅटची सातबारा उताऱ्यावर नोंदणी केल्याबद्दल मंडल अधिकारी आणि तलाठ्याने दारू, मटणची पार्टी चक्क लाच म्हणून स्विकारल्याची ही घटना आहे. एका व्यक्तीच्या शेतात मद्य आणि मटणावर ताव मारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं आहे. दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केली असून घटनेची चौकशी केली जात आहे.

मंडल अधिकारी आणि तलाठ्याने फ्लॅटची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करून फेरफार नक्कल देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेतली आहे. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीला चक्क दारू आणि मटणाची पार्टी देण्यास सांगितलं. या घटनेची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला समजताच त्यांनी सापळा रचला आणि दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी बुलडाणा जिल्ह्यातील पिंप्री घनगर शिवारातील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतात ही कारवाई केली आहे.

विशेष म्हणजे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दोन दारुच्या बाटल्याही जप्त केल्या आहेत. संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठ्याने यापूर्वी आणखी किती जणांना अशाप्रकारे लुटलं आहे. याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे. कधी चहावाल्याकडे पैसे ठेवा तर कधी पान टपरीवाल्याकडे अशा पद्धतीने लाच खाण्याचे प्रकार या आधी उघड झाले आहेत मात्र पैशाच्या बदल्यात दारू मटण खाताना अधिकारी धरण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी.


शेअर करा