जन्मदात्या आईला घराबाहेर काढले खरे मात्र त्यानंतर …

शेअर करा

घरगुती कारणातून भांडण झाले म्हणून मुलाने आपल्या ६० वर्षीय आईला घराबाहेर काढले. आज ना उद्या मुलाला दया येईल या अपेक्षेने आई दोन महिने परिचितांकडे राहिली. मात्र मुलाला दया आलीच नाही. त्यामुळे हताश झालेल्या आईने पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुलाला ही चांगलीच अद्दल घडली आहे .

नगर जिल्ह्यातील राहुरी खुर्द या गावातील ही घटना आहे. गावातील मित्र कॉलनीमध्ये अनुसया सीताराम डोळस (वय ६०) या आपल्या मुलासोबत राहत होत्या. घरात मुलगा संदीप, सून, नातवंडे असा परिवार आहे. घरगुती कारणातून मुलाचे आईसोबत भांडण होत असे. मार्च महिन्यातही असेच भांडण झाले. त्यावेळी मुलाने मागचा पुढचा विचार न करता आपल्या आईला घराबाहेर काढले.

संतापलेला मुलगा पाहून अखेर आईचाही नाइलाज झाला. ती घराबाहेर पडली. दुसरे जवळचे कोणीच नाही. त्यामुळे ओळखीच्या लोकांकडे ती राहू लागली. त्यातच करोनाचा संसर्ग वाढून लॉकडाउनही लागला. अशा काळात दोन महिन्यांपासून आई हलाखीचे जीवन जगत आहे. मुलाला आपली चूक कळेल, दया येईल आणि आपल्याला परत घरी जाता येईल. या आशेवर त्या आईने दिवस काढले.

मात्र मुलामध्ये काहीच फरक पडला नाही. ओळखीच्या लोकांकडे तरी किती दिवस राहणार ? आपले घर असूनही असे हालाखीचे जीवन का जगायचे ? मुलाला आईची पर्वा नसेल तर आईने तरी का दया दाखवायची ? असा विचार करून परिचितांच्या मदतीने त्या आईने राहुरी पोलिस ठाणे गाठले. तिने आपल्यासोबत घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तिची फिर्याद नोंदवून घेतली.

वृद्ध आईचा मुलगा संदीप डोळस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ च्या कलम २४ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तरी त्या आईला पुन्हा आपल्या घरात प्रवेश मिळेल किंवा सांभाळ करण्याची हमी मुलाकडून मिळेल, अशी अपेक्षा त्या आईला आणि मधल्या काळात तिला आधार देणाऱ्यांना आहे.


शेअर करा