नगर महापालिकेच्या रंगेल शंकर मिसाळ व अनिल बोरगेंचे मीठ कोणी-कोणी खाल्ले ? : नगर सह्याद्रीचे जबरदस्त संपादकीय

शेअर करा

महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ यांच्यासह इतर दोन व्यक्तींनी छळ केल्याची तक्रार देणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण करण्याचा दुर्दैवी प्रकार आज घडला आहे. दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के यांनी या विषयावर प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख लिहला असून नगरमधील ‘ आम्ही तुम्हाला सांभाळतो तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या ‘ ह्या प्रवृत्तीची जबरदस्त पोलखोल केली आहे .

काय आहे नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के यांचे संपादकीय ?

जिल्ह्यात कायदा आणि कायद्याचा धाक राहिलाय का असा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे. पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार यांचे नव्याचे नऊ दिवस संपलेत का असा आमचा थेट सवाल आहे. कायद्याचा धाक निर्माण करण्याचे काम नक्की कोणाचे? ज्यांच्याबद्दल समाज आदराने बोलतो ते प्रशासन आज बेईज्जतीत गेलंय!

स्त्री जातीच्या भू्रुणाचा गर्भपात करताना एक डॉक्टर रंगेहात पकडला गेला. समाजसेवेचा बुरखा घातलेला चेहरा यानिमित्ताने टराटरा फाडला गेला. डॉक्टर गजाआड झाला असला तरी नगर शहरापासून दहा-बारा किलोमिटर अंतरावर हे सारे चालतेच कसे? माणुसकीलाच नव्हे तर वैद्यकीय पेशाला काळीमा फासण्याचे हे कृत्य! याची चर्चा थांबत नाहीत तोच नगर शहरातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

महानगरपालिकेच्या दवाखान्यात नर्स म्हणून काम करीत असलेल्या महिलेचा! पालिकेच्या दवाखान्यात नर्स म्हणून काम करत असलेल्या महिलेची अय्याशी! खरं तर महापालिकेत काम करत असलेल्या पतीचं अकाली निधन झालं आणि त्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर या महिलेची नियुक्ती झाली. दोन मुलं आणि सासू यांच्यासोबत सारं काही सुखानं चालू असताना दुर्बुद्धी सुचली! अन् व्याभिचार मनात डोकावू लागला! खरंतर हा त्या महिलेचा खासगी विषय! मात्र, या महिलेच्या मुलाला या व्याभिचाराचे चटके बसले हे वाईट! आणि चटके देणारे होते महापालिकेतील अधिकारी! महिलेला घर घेऊन देण्यात मदत केल्याची जाहीर कबुली देणारे शंकर मिसाळ हे अग्निशमन विभागाचे प्रमुख! या महिलेला अनुकंपा नोकरी लावण्यास मदत केल्याचे आणि घर घेऊन देण्यातही मदत केल्याचे त्यांनी जाहीरपणे कबुल केलेे! मात्र, मिसाळ यांचा अनुकंपा नोकरी लावण्यात काहीच संबंध नसल्याचे मनपा कामगार संघटना म्हणते!

मिसाळ यांच्या जोडीने या प्रकरणात दुसरे नाव आले आहे ते महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख असणार्‍या डॉ. अनिल बोरगे यांचे! खरंतर हे महोदय अनेकदा वादग्रस्त ठरलेले! मिसाळ यांच्या जोडीने हे बोरगे महोदय या महिलेच्या घरात राजरोस पार्ट्या झोडत बसायचे हे वास्तव त्या मुलाने फिर्यादीत मांडलेय! मात्र, बोरगे यातील कोणालाच ओळखत नाहीत! मी यांना ओळखतच नाही एवढा एकच मंत्र सध्या जपत आहेत. यातील तिसरा आरोपीही महापालिकेतील कर्मचारी!

सदर प्रकरणातील महिला आरोपीच्या पिंजर्‍यात आलीय आणि तिला तसे आणले ते तिच्याच मुलाने! घरात चालणारी या तीन अधिकार्‍यांसोबतची पार्टी आणि त्यानंतरचे चाळे या मुलाला पहावले नाही आणि त्यानंतर त्याने बंड केले! हे बंडच आज या तीनही अधिकार्‍यांना जड जात आहे. खरं तर आईच्या घाणेरड्या वागण्याच्या विरोधात बंड करणार्‍या या मुलाला सलामच केला पाहिजे! मात्र याबाबतचा गुन्हा दाखल होत असताना जे काही घडलं ते अत्यंत वाईट आणि चिंताजणक!

मुलगा फिर्याद देण्यास पोलिस ठाण्यात सकाळी १० वाजता गेला! अल्पवयीन असणार्‍या या मुलाला सायंकाळी ७ वाजेपर्यंत बसून ठेवण्यात आले! त्या मुलाला साधे पाणी देखील पिण्यास दिले नाही! नाश्ता, जेवण हे तर फार लांब! त्याने काही खाल्ले की नाही याची साधी विचारपूस देखील करण्याचे काम पोलिसांनी केले नाही. या घटनेचे वार्ताकन करण्यास आलेल्या पत्रकारांनी या मुलाला चहा- नाश्ता खाऊ घातला! पोलिसांना साधे पिण्याचे पाणी देखील द्यावेसे वाटले नाही. फिर्याद दाखल करण्यास म्हणजेच त्याचा जबाब नोंदविण्यास बसलेल्या अधिकार्‍यांनी या मुलाला असे प्रश्‍न विचारले की जसा काही तो सराईत गुन्हेगार आहे! ‘आमच्या घरात मिसाळ, बोरगे दारु आणतात आणि दारु पित बसतात’ असा जबाब त्या मुलाने नोंदविला! हा जबाब नोंदवून घेणार्‍या अधिकार्‍याने त्या मुलाला काय विचारावे? अधिकार्‍याचे प्रश्‍न होते ते असे…… त्या बाटल्या दारुच्याच होत्या हे कशावरून? त्या बाटल्यांवर काय नाव होते? दारुच्या होत्या कि बिअरच्या? त्यांचा रंग कोणता होता? त्या बाटल्या कोल्ड्रींकच्या असतील? तुला काय माहिती त्यात दारुच होती?

एसपी साहेब, एका अल्पवयीन मुलाचा जबाब नोंदविताना आणि तोही त्याच्यावर अन्याय झालेला असताना अशा पद्धतीने जबाब नोंदविला जाण्याची ही कोणती पद्धत? मुलाचा जबाब नोंदवून घेताना बालकांसाठी काम करणार्‍या संस्थांचे दोन प्रतिनिधी तेथे होते. हे प्रतिनिधी मोबाईलवर बोलण्यात आणि मोबाईलवर गेम खेळण्यात मश्गुल होते! आणि हे सारे मिडियाने पाहिले आहे. दारुच होती का, तिचा रंग कोणता होता? बिअर होती की दारु असले प्रश्‍न विचारले जात असताना बालकांसाठी काम करणार्‍या चाईल्ड लाईन अथवा बालकांच्या हक्कासाठी काम करणार्‍या समितीच्या दोघांपैकी कोणीतरी या पोलिस अधिकार्‍यांना अटकाव करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही. त्या मुलाने दारु प्यायला पाहिजे असेच या प्रश्‍नांचं उत्तर होतंय! दारु पिला असता तर त्यालाही कळाले असते त्या दारुची चव! महापालिकेतील हे तिघे बदमाश त्या बदफैली करणार्‍या महिलेला सोबत घेऊन ढोसत बसायचे! आता हा मुलगाही त्यांच्यासोबत ढोसत बसायला पाहिजे होता काय?

मुलगा जबाब देतोय की मला म्हणजेच त्याला तो राहत असलेल्या बिल्डींगच्या चौथ्या मजल्याच्या टेरेसवरुन खाली फेकण्याचा आणि जीवे मारुन टाकण्याचा प्रयत्न झालाय! यातील दोघांनी त्याचे हात धरल्याचे तर एकाने पाय धरुन त्याला टेरेसवर नेले आणि तुझी कायमची कटकट संपवितो म्हणत त्याला खाली फेकण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने बोरगेसह एकाच्या हाताला चावा घेतला आणि तो त्यांच्या तावडीतून सुटला! तरीही या तिघांनी त्याचा पाठलाग केला! मात्र तो निसटला! या घटनाक्रमात भारतीय दंड विधानाचे कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. कायदेतज्ज्ञही त्यास सहमत आहेत! मात्र, पोलिसांचे कायदेशिर सल्लागार असणार्‍या वकिल महोदयांनी असे कलम लावता येणार नसल्याचे सांगितले! या मुलाला फेकून दिले नाही आणि तो फेकून देण्याआधीच पळून गेला असल्याने हे कलम लावता येणार नसल्याचे तोफखान्याचे कर्तबगार पोलिस निरीक्षक मुलानी यांचे म्हणणे!

मुलानी साहेब, मुलगा पळून गेला नसता तर! अहो, त्याचा मृतदेहच हाती लागला असता! मग ३०२ कलम लावले असते असे श्री. मुलानी यांचे उत्तर! मग ३०७ कलम काय सांगते याचा अभ्यास कोणी करणार आहे की नाही! एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्याच्या इराद्याने त्या व्यक्तीला मारहाण करणे किंवा तसे कृत्य करणे असे असेल तर मग शंकर मिसाळ, अनिल बोरगे घाटविसावे यांनी नक्की काय केले! हेच तर केले नाही! मग, कसा नाही दाखल झाला ३०७ याचे उत्तर पोलिस अधीक्षकांनी देण्याची आवश्यकता आहे.

गुन्हा दाखल होत असताना आरोपी कोण आहेत याची माहिती समोर आली असताना तोफखान्याचे सारेच कारभारी आणि कर्मचारी का राहिले गपगार याचेही उत्तर मिळावे! एरवी किरकोळ गुन्ह्यात फक्त नाव समोर आले तरी पोलिसांचं पथक त्याच्या शोधार्थ रवाना होते! त्याला पकडून आणले जाते आणि त्यानंतर गुन्हा दाखल होतो, असे अनेक प्रकार घडलेत आणि घडत आहेत! शंकर मिसाळ, अनिल बोरगे यांच्याबाबत तसे का घडले नाही. सायंकाळी पत्रकारांनी याबाबत विचारणा केल्यानंतर आता आम्ही शोध मोहिम राबवू असे उत्तर मिळाले! याच तोफखाना पोलिस ठाण्यात याच मुलाला सात दिवस आधी फक्त बसून ठेवण्यात आले! महिलेला आणि त्या अय्याशबाज मिसाळला बोलावून घेतले गेले! सन्माननीय पोलिस निरीक्षक मुलानी यांच्यासमोर याच मिसाळ याने महिलेसोबत काय संबंध आहेत याची जाहीर कबुली दिली! मुलगा त्यावेळीही तक्रार देत होता! मात्र, मुलानींनी त्या मुलाचे काहीएक ऐकूण घेतले नाही हेही वास्तव! मुळात हे प्रकरण एलसीबीकडे आणि त्यानंतर बालहक्क समितीकडे पाठविण्याचीच गरज नव्हती! थेट तक्रार दाखल होऊ शकत होती! पण, तसे झाले नाही कारण आरोपीच्या पिंजर्‍यात मनपाचे अधिकारी होते. सदर प्रकरण नाजूक होते आणि आहे! मुलाला साथ द्यायला कोणीच पुढे आले नसताना मिडिया पुढे आला आणि आम्ही या नाजूक प्रकरणाच्या मुळाशी गेलो.

कोरोना, कोव्हीड १९ आणि लॉकडाऊन या कालावधीत या अधिकार्‍यांना दारु भेटत होती आणि ते ढोसत बसायचे! मनपाचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी हे नगर शहरात नगरकरांची काळजी घेत फिरायचे! आता महापालिकेचे आयुक्त या दोन अधिकार्‍यांवर काही कारवाई करणार आहेत की नाही पहावे लागणार आहे. याशिवाय प्रशासनाचे जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकार्‍यांनी देखील या बदमाश अधिकार्‍यांबाबत लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. दोन दिवसात खाकीतील काहीजणांना भरपूर मिठ भेटले आणि त्यामुळेच ते या मीठाला जागले! खाल्या मिठाला जागावं ही आपली संस्कृती आणि तेच काम प्रामाणिकपणे खाकीतील काहींनी केलं! या मुलाच्या जागी आपण स्वत: अथवा आपलं स्वत:चं पोरगं असतं तर असा क्षणभर विचार यांनी का नाही केला! खाल्या मिठाला जागलंच पाहिजे, पण मीठ कोणाचं खावं याचा शिकवणी वर्ग जमलंच तर स्वत: पोलिस अधीक्षकांनी घ्यावा आणि त्याची सुरुवात तोफखाना पोलिस ठाण्यातून करावी!

अल्पवयीन मुलावरील अन्याय- अत्याचाराचे प्रकरण चार दिवसांपासून चर्चेत आले असताना व मुलगा न्याय मागत असताना कोणतीही सामाजिक संघटना अथवा बालकांसाठी न्याय मागणारे सो कॉल्ड कार्यकर्ते मुग गिळून का बसलेत? कोणाचीच दातखिळी निघायला तयार नाही! एरवी अल्पवयीन मुलाबाबत किरकोळ प्रकार घडला तरी मोर्चे, निषेध नोंदविणारी शेकडो पत्रके निघतात! कारवाईची मागणी होते. मुलाला छळणार्‍या आणि चटके देणार्‍यांची नावे आरोपी म्हणून समोर आली असताना याचा साधा निषेध देखील नोंदविला जात नाही! जे खरं घडलंय ते समोर आलं आहे.

मग, आरोपी म्हणून नावे समोर आली आहेत! घटना घडून सात दिवस झाले आणि मुलगा सतत न्याय मागत असताना आरोपींवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यासाठी एकही माय का लाल पुढे यायला तयार नाही! आता गुन्हा दाखल होऊन चोवीस तास उलटले असताना आरोपींना अटक नाही! आरोपींना अटक करण्याची मागणी करणारे पत्रक एकही संघटना अथवा राजकीय पक्ष काढायला तयार नाही! खाकीतील कोणी- कोणी मिसाळ- बोरगेंचे मिठ खाल्लं याची तपासणी पोलिस अधीक्षक करतील! मात्र, पत्रकबाजीत माहिर असणार्‍या कथीत संघटना, कथीत सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्ष व त्या पक्षांचे नेते अशा सार्‍यांनीच मिसाळ- बोरगेंचे मीठ खाल्ले आहे असं नगरकरांनी समजून घ्यावे! कारण, यांची तपासणी करण्यासाठीचा पॅरामिटर तुम्ही म्हणजेच जनता आहे! ( संपादकीय समाप्त )

अहमदनगर महापालिकेतील ‘ त्या ‘ दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात अल्पवयीन मुलाची धक्कादायक तक्रार


शेअर करा