भाजप आमदाराच्या मुलीच्या लग्नात अधिकाऱ्याचा डान्स व्हायरल , पुण्यातील प्रकार : पहा व्हिडीओ

शेअर करा

भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे बेफाम नाचतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर याच लग्नसोहळ्यात आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी सुनील बेळगावकर हे आमदार लांडगे यांच्यासोबत नृत्य करताना दिसत आहेत.

आमदारांच्या कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत इतरांनीही नृत्य केलं. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी देखील सहभागी होते. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आमदार आणि अधिकारी दोघांवर आता टीकेची झोड उठत आहे. सामान्य नागरिकांच्या लग्नात कारवाईचा बडगा उगारणारे प्रशासन आता काय कारवाई करणार ? याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे .

पिंपरीत कोरोनाचे नियम पाळावेत यासाठी ज्या महापालिकेनं जनजागृती करणं गरजेचं असतं त्याच महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः नियमांना तिलांजली देत आहेत. दुसरीकडे महापालिका तक्रार आल्यानंतर कारवाई करू, अशी पळवाट शोधत आहे. सर्वसामान्यांवर मात्र कोरोनाच्या नियमाची पायमल्ली केल्यानंतर प्रशासनाकडूनच तक्रार दाखल करून सर्रासपणे कारवाई केली जात आहे. मग लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका अधिकारी यांच्याबाबत उदासीनता का? असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय.

भाजप आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचे येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटला.

सदर कार्यक्रमात आमदारांनी भंडारा उधळत कोरोनासंबंधी सर्व नियम पायदळी तुडवल्याने टीका होत आहे. या सोहळ्यात काही अपवाद वगळता आमदारांसह अनेक जण विनामास्क वावरत असताना व्हिडीओत दिसत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यामुळे कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.


शेअर करा