
गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध कृतीने वादग्रस्त ठरलेले महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना तातडीने बडतर्फ करावे अन्यथा या अधिकाऱ्याच्या पुतळ्याचे अंत्यसंस्कार मनपाच्या दालनासमोर करू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना याबाबत निवेदन दिले आहे.
डॉक्टर अनिल बोरगे अनेक दिवसांपासून नगर मनपात कार्यरत असून महापालिकेतील त्यांचा कारभार सतत वादग्रस्त ठरलेला आहे. शहरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे वेळेवर अंत्यसंस्कार न करणे , स्वतःच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता एका दालनात अनेक पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना एकत्र करून गाण्यावर थिरकणे , स्वतःच्या कार्यालयात गाणे शूट करून ते पसरवणे, उत्कृष्ट काम करणार्या आशा कामगार महिलांचे वेळेवर पगार न करणे, मातृत्व वंदना योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ न देणे, कोरोना पीडितांनी त्यांना कामानिमित्त फोन केल्यास कोणतेही उत्तर न देणे, बोल्हेगाव येथील मनपा महिला कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन पार्टी करत असताना 14 वर्षीय मुलाला मद्यप्राशन करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, असे अनेक प्रकार या अधिकाऱ्याने पूर्वीही केलेले आहेत, असे निवेदनात म्हटलेले आहे .
सदर निष्क्रिय व गांभीर्य नसलेल्या अधिकाऱ्याविरोधात कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे अन्यथा प्रहार संघटनेचे ह.भ.प. अजय महाराज बारस्कर राज्य प्रवक्ते संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनपासमोर या अधिकाऱ्याच्या पुतळ्याचे अंत्यसंस्कार करण्यात येतील असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेसी, सचिव प्रकाश बेरड, उपाध्यक्ष देविदास येवले, सल्लागार मालोजी शिकार यांनी दिला आहे