… म्हणून ‘ तो ‘ चोरायचा धूम स्टाईलने महिलांचे मंगळसूत्र, पोलीस देखील झाले चकित

शेअर करा

कोणतेही प्लॅनिंग न करता लोकांवर नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन लादला, त्यांचे काय परिणाम होतील याचा कोणताही विचार केला नाही. लॉकडाऊनने अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आणली त्यातील काहींनी आत्महत्या केल्या तर काही जण गुन्हेगारीकडे वळाले. पुणे येथील पोलिसांनी एका साखळीचोराला पकडले तेव्हा तो साखळीचोर हा चक्क पुण्यात रिअल इस्टेटमध्ये एजेंटचे काम करत असल्याचे उघडकीस आले.

भाजी आणण्यासाठी जात असलेल्या एका महिलेचे त्याने पाठलाग करुन त्यांचे ३५ हजार रुपयांचे मंगळसुत्र हिसकावले होते . त्यानुसार दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला. हा प्रकार रस्ता पेठेतील गृहलक्ष्मी अपार्टमेंटसमोर मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला होता. ह्या साखळीचोरास धरल्यानंतर आपण रिअल इस्टेटमध्ये एजेंटचे काम करत असल्याचे सांगितल्यावर पोलीस देखील चकित झाले. आपण आर्थिक कारणामुळे चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे . मोहम्मद आतिफ इक्बाल शेख (वय २६, रा. नाना पेठ) असे या एजंटचे नाव आहे.

मंगळसुत्र हिसकावल्याची तक्रार दाखल झाल्यावर पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कपुरे, हवालदार साहिल शेख, संतोष काळे, निलेश साबळे, प्रमोद टिळेकर, सुमित कुट्टे, स्वप्नील वाघोले यांच्या पथकाने महिलेने वर्णन केलेल्या गाडीचा शोध सुरु केला. हिरव्या रंगाची स्कुटर व दागिन्यांच्या दुकानांची पोलिसांनी तपासणी सुरु केली. काही कालावधीत शेख याचा नंबर पोलिसांना मिळाला आणि तो दागिने विकण्यासाठी नाना पेठेतील ज्वेलर्समध्ये येणार असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली. उपलब्ध माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दागिने काढून दाखविल्यावर फिर्यादी यांनी ते आपलेच असल्याचे सांगितले आहे .

शेख हा नाना पेठ आणि कॅम्प परिसरात रियल इस्टेट एजंटचा व्यवसाय करतो. लॉकडाऊनच्या काळात त्याचा व्यवसाय संपल्यात जमा झाला होता. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक चणचण जाणवत होती. त्यामुळे त्याने ज्येष्ठ महिलेचे मंगळसुत्र हिसकाविल्याचे समोर आले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे .


शेअर करा