… अन स्वतःच्याच शोकसभेला मयत महिला प्रकट झाली

  • by

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,40,702 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक भयंकर घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला. मात्र त्यानंतर काही दिवसांनी ती महिला परत आल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरच्यांना सुखद धक्का बसला मात्र प्रशासनाचा कारभार किती गलथान स्वरूपाचा आहे हे देखील या निमित्ताने उघड झाले .

आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील रुग्णालयात एका 70 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 15 मे रोजी तिच्या पतीने पॉलिथीनमध्ये असलेला पत्नीचा मृतदेह दफन केला. त्यानंतर 1 जून रोजी कुटुंबाने शोकसभा आयोजित केली होती. पण दुसऱ्याच दिवशी ही महिला घरी परतल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील ख्रिश्चनपेठ गावात ही घटना घडली आहे. गिरिजाम्मा असं या महिलेचं नाव असून यांना कोरोनाची लागण झाली होती. 12 मे रोजी विजयावाडाच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

महिलेचे पती नियमितपणे पत्नीला पाहण्यासाठी रुग्णालयात जात होते. 15 मे रोजी त्यांना त्यांची पत्नी कोविड वॉर्डमध्ये नसल्याचे लक्षात आलं. त्यांनी इतर वॉर्डमध्येही तपास केला मात्र गिरिजाम्मा यांचा पत्ता लागला नाही. त्यावेळी तिथल्या नर्सनी गिरिजाम्मा यांचा मृत्यू झाला असावा असे त्यांना सांगितले.

त्यानंतर रुग्णालयाने त्यांना शवगृहातून पॉलिथीनमध्ये गुंडाळलेला एक मृतदेह दिला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर त्यांच्या पतीने तो मृतदेह गावी आणला. कोरोनाच्या भीतीने रुग्णालयातून पॉलिथीनमध्ये गुंडाळून दिलेला मृतदेह कुटुंबीयांनी उघडून पाहिला नाही आणि तो दफन केला.

1 जून रोजी कुटुंबाने एका शोकसभेचे आयोजन केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गिरिजम्मा घरी परतल्या. त्यांना पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर दुसऱ्याच कोणत्या तरी मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. या सर्व प्रकरणाची माहिती नसलेल्या गिरिजम्मा कोरोनातून बरे झाल्यानंतरही कोणी आपल्याला घ्यायला आलं नाही यामुळे दु:खी होत्या. रुग्णालयाने त्यांना घरी जाण्यासाठी 3000 रुपये दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.