लाडक्या माहुताच्या निधनाने हत्तीलाही शोक, सोंडेने दिला अखेरचा निरोप : व्हिडीओ पहा

  • by

आपल्या लाडक्या मालकाच्या निधनानंतर सैरभैर झालेले पाळीव प्राणी आपण पाहिले आहेत. लाडक्या माहूताच्या निधनानंतर त्याला अखेरचा निरोप देणाऱ्या हत्तीचा हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे. कर्करोगाशी झुंजताना प्राण गमावलेल्या माहूताच्या पार्थिवासमोर हत्तीने सोंडेने मानवंदना दिली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

केरळमधील कोट्टायममध्ये ही मन हेलावून टाकणारी घडना घडली. कुण्णक्कड दामोदरन नायर यांना प्रेमाने ओमानचेत्तन म्हटलं जायचं. हत्तींवर ते लेकरांप्रमाणे प्रेम करत असत. जवळपास सहा दशकांपासून ते विविध हत्तींचा सांभाळ करत होते. 3 जून रोजी ओमानचेत्तन यांनी अखेरचा श्वास घेतला. कॅन्सरशी लढताना वयाच्या 74 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

ओमानचेत्तन यांच्या निधनाने नायर कुटुंबावर शोककळा पसरली. जितकं दुःख नायर परिवाराला झालं, तितकाच ओमानचेत्तन यांच्या कुटुंबातील हत्तींनाही शोक अनावर झाला. पल्लट ब्रह्मदातन या हत्तीला आपल्या पितृतुल्य माहूताच्या निधनाचं अतीव दुःख झाले आणि त्याने देखील अन्नपाणी घेणं बंद केलं. केरळातील महत्त्वाच्या सण समांरभांवेळी ब्रह्मदातन आणि ओमानचेत्तन या हत्ती-माहूताची जोडी नेहमी उपस्थित राहत असे. थ्रिसूर पूरमच्या वेळी ही जोडगोळी अखेरची दिसली होती.

ओमानचेत्तन यांच्या निधनाचं वृत्त समजल्यावर पल्लट ब्रह्मदातन या हत्तीचे मालक त्याला घेऊन अंत्यदर्शनासाठी आले. यावेळी माहूताच्या पार्थिवासमोर सोंड उंचावून हत्तीने अखेरचा सलाम केला. त्यानंतर तो अक्षरशः नतमस्तक झाला. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या हृदयातही कालवाकालव झाली. अंत्यसंस्कारांना उपस्थित असलेल्या एकाने हा व्हिडीओ शूट केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला.