‘ एवढा ‘ एक विधी झाला की पैशाचा पाऊस पडणार , पुढे काय झाले ?

शेअर करा

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून त्यासाठी कराव्या लागणाऱ्या पूजेसाठी जालन्यातील मांत्रिकाने पुण्यातील व्यक्तीकडून ५२ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जालन्यात जाऊन डमी व्यक्तीला मांत्रिकाकडे पाठवून खातरजमा केली आणि त्याला ताब्यात घेतले. अशा लोकांच्या बळी पडण्याचे प्रकार आधी अशिक्षित लोकांसोबत घडत असत मात्र आता चक्क सुशिक्षित लोक देखील यास बळी पडू लागलेले आहेत. पुण्यातील धायरी येथे राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला ‘पैशांचा पाऊस पाडून देतो, त्यासाठी छोटी पूजा करावी लागेल आणि पूजेसाठी काही पैसे पूजेत ठेवावे लागतील असे सांगत आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. स्वत:मध्ये दैवी शक्‍ती असून, आपण चमत्कार करू शकतो, असा दावाही केला.

त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने आरोपीला ५२ लाख रुपये दिले. इतकी मोठी रक्कम देऊनही पैशांचा पाऊसही न पाडल्याने फिर्यादीने आरोपीला पैसे देणे बंद केले. त्यावर आरोपीने ‘तुमचे काम झाले आहे. एक शेवटचा विधी राहिला आहे, तो तुम्हाला करावा लागेल,’ असे सांगितले. त्यामुळे फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यावरून किसन आसाराम पवार याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीने तत्काळ गुन्हे शाखेच्या उपायुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जालना जिल्ह्यातील हिवरखेड येथे आरोपीच्या तळावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीच्या वापरातील साहित्य ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या युनिट-३चे वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक निरीक्षक अमृता चवरे, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, कर्मचारी दीपक मते, महेश निंबाळकर, राजेंद्र मारणे, संदीप तळेकर, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, सुजित पवार, संतोष क्षीरसागर, विल्सन डिसोझा, कल्पेश बनसोडे, रामदास गोणते, सोनम नेवसे यांनी ही कामगिरी केली.


शेअर करा