
नगर जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येत असला तरी दुसरीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. नेवासा तालुक्यातील चांदा येथे गुरुवारी तीन तारखेला रात्री साडेनऊच्या सुमारास भर चौकात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हा खून केला असून ज्ञानदेव सोपान दहातोंडे ( वय 40 राहणार चांदा तालुका नेवासा ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
ज्ञानदेव दहातोंडे हे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चांदा येथे नदी चौकात मित्रांसोबत बोलत उभे होते त्यावेळी दोघेजण दुचाकीवर आले त्यातील एकाने दहातोंडे यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि त्यानंतर हल्लेखोर तेथून फरार झाले. दहातोंडे यांच्या मानेवर वार करण्यात आले, त्या वेळी घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. दहातोंडे यांना नगर येथील खासगी रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचे निधन झाले होते
पोलीस पाटील कैलास अभिनव यांनी सोनई पोलिसांना माहिती देताच अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे आधी घटनास्थळी तातडीने हजर झाले. पोलिसांनी चौकशीसाठी एक जणाला तात्काळ ताब्यात घेतले असून हत्या कोणत्या कारणाने झाली याची माहिती त्याच्याकडून घेण्यात येत आहे. सोनई पोलिसात उपसरपंच चांगदेव नारायण दहातोंडे यांनी फिर्याद दिली असून धनेश शिवाजी पुंड व एका अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.