नवरीच्या दारात दोन वराती, वरमाला एकाच्या गळ्यात मात्र नांदायला दुसरीकडेच

शेअर करा

उत्तर प्रदेशातील एटामध्ये मात्र एका लग्नाची भलतीच गोष्ट वऱ्हाडी मंडळींना पहायला मिळाली असून लग्न घटीकेला काही वेळ बाकी असतानाच नवरीच्या दारी दोन वराती आल्या. यावेळी नवरीने आधी आलेल्या नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकली मात्र त्यानंतर नंतर आलेल्या नवरदेवासोबत सात फेरे घेऊन नांदायला गेली. या प्रकाराने वऱ्हाडी मात्र चांगलेच चक्रावून गेले असून संपूर्ण उत्तर प्रदेशात या लग्नाची खमंग चर्चा सुरू आहे

उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील सिरांव या गावात ही अजब घटना घडली. सिरांवमध्ये एक नवरदेव वरात घेऊन नवरीच्या घरी आला. त्यामुळे नवरीने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकली. त्यानंतर काही वेळाने तिच्या घरी दुसरी वरात आली. तेव्हा नवरीने ज्याच्या गळ्यात वरमाला घातली तो नवरदेव वयाने मोठा असल्याचं सांगून त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या नवरदेवाबरोबर सात फेरे घेतले आणि त्याच्याबरोबर नांदायला गेली.

विशेष म्हणजे वरात घेऊन आलेले दोन्ही नवरदेव एटा जिल्ह्यातील आहेत. एक वरात मिरहची पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जिन्हेंरा गावातून आली होती. तर दुसरी वरात अवागढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरौरा गावातून आली होती. ज्याच्या गळ्यात सर्वात आधी वरमाळा घालण्यात आली होती, तो नवरदेव अवागढचा रहिवासी आहे.

नवरीच्या या निर्णयामुळे सर्वच जण चक्रावून गेले. त्यामुळे सर्वात आधी वरात घेऊन आलेल्या नवरदेवाच्या कुटुंबीयांनी एकच गोंधळ घातला. त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत गेलं. पोलिसांनी लग्नात येऊन नवरीच्या वडिलांना अटक केली आहे. लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप नवरदेवाच्या कुटुंबीयांनी केला आहे.


शेअर करा