पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला फकीर म्हणवतात. मग त्यांनी दिल्लीत 15 एकरांचे घर बांधण्याचा उपद्व्याप कशासाठी चालवला आहे, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ‘सामना’तील रोखठोक या सदरात त्यांनी यासंदर्भात भाष्य केले असून मोदींचे उपद्याप हे फकिरीला शोभत नाहीत अशाही टोला संजय राऊत यांनी हाणला आहे .
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कोरोना काळात वेळ जात नसावा म्हणून तिसरे लग्न केले. ब्रिटनमध्ये कोरोना नियंत्रणात आला नाही तर जॉन्सनसाहेब वेळ घालविण्यासाठी चौथ्यांदा आणि पाचव्यांदाही बोहल्यावर चढतील. तर दिल्लीत कोरोना काळात नवे संसद भवन, पंतप्रधानांसाठी पंधरा एकरात नवे घर, नवे उपराष्ट्रपती निवास उभे राहत आहे. पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, पण हा सर्व उपद्व्याप फकिरीत बसत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मेहुल चोक्सी आणि पश्चिम बंगालमधील राजकीय खेळांच्या माध्यमातून केंद्र सरकार केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मेहुल चोक्सी हा भगोडा ऑण्टिग्वाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. ऑण्टिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी चोक्सीला भारताच्या हवाली केले तर नव्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात ब्राऊन यांचा पुतळा नक्कीच उभारला जाईल. 2022 च्या प्रजासत्ताक दिनाचे ते सन्माननीय पाहुणेही असतील, काय सांगावे! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मिस्टर ब्राऊन यांना ‘भारतरत्न’ही दिले जाईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
मेहुल चोक्सीला आपल्याकडे पाठवलाच तर ‘मीडिया’ कोरोना वगैरे विसरून मेहुल चोक्सीच्या रोमांचकारी कथांच्या मागे लागेल व लोकांचा तेवढाच वेळ जाईल. गरीबांना काय जॉन्सनप्रमाणे तिसरे लग्न करता येत नाही व नवे घरही बांधता येत नाही, पण अशा प्रकरणांच्या कथानकात ते चांगला वेळ घालवतात, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
द गार्डियन मधूनही टीकास्त्र
द गार्डियन मध्ये एका लेखात मोदी सेंट्रल व्हिस्टाच्या नावाखाली दिल्लीतील मुघलकालीन नामोनिशाण मिटवत असून लेखात त्यांची तुलना ही अफगाणिस्तान मधील तालिबान राजवटीशी केलेली आहे . हिंदू तालिबान असे नाव यात देण्यात आले असून मोदी कोरोना काळात सेंट्रल व्हिस्टाचे काम करून घेत आहेत तर दुसरीकडे नागरिकांना कोरोनाची लस देखील मिळत नाही यावर देखील बोट ठेवण्यात आले आहे .