‘ मोदींची हिटलरशी तुलना अयोग्य, हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता ‘

शेअर करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतीच अर्थव्यवस्था प्रभावित झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षातील जीडीपी नुकतीच जाहीर केलीय. त्यानुसार भारताच्या जीडीपीत 7.3 टक्क्यांची घट दिसून आली आहे. गेल्या चार दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचं सांगितलं जात आहे. मागील आर्थिक वर्षात ही घट 4 टक्के होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जोरदार टीका केली असून पंतप्रधान मोदींची हिटलरशी तुलना चुकीची असल्याचं सांगत हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी अमहाबादेतील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींची तुलना हिटलरशी केली होती. हा धाका पकडत नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. मोदी यांची तुलना हिटलरशी करणं चुकीचं असल्याचं सांगताना त्यांनी मोदींना टोला लगावलाय. “काही लोक पंतप्रधानांची तंतोतंत तुलना हिटलरशी करतात ते 100 टक्के बरोबर नाही. इतर गोष्टी अलाहिदा, हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता हे विसरता येणार नाही”, असं खोचक ट्वीट नितीन राऊत यांनी केलंय.

जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अहमदाबादमधील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. नामांतरावरुन जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडलं होतं. “स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते आणि गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”, असं ट्विट करत आव्हाड यांनी मोदींवर निशाणा साधला होता.


शेअर करा