उद्धव ठाकरे, अजित पवार दिल्ली दरबारी मोदींच्या भेटीला, रोहित पवारांचे ‘ दोनच ‘ शब्द

शेअर करा

राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अशा विविध 12 विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते. ही बैठक जवळपास दीड तास चालली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या भेटीचं दोन शब्दात वर्णन केलं असून लोकशाहीचं सौंदर्य! असं या भेटीबाबत रोहित पवार ट्विटरवर म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण असे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिनही पक्षाचे नेते उपस्थित होते तर केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे देश आणि राज्यातील चार मोठ्या राजकीय पक्षाचे प्रमुख आणि मोठे नेते एकाच ठिकाणी, एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी या भेटीचं वर्णन अवघ्या दोन शब्दात केलं आहे. लोकशाहीचं सौंदर्य असं कॅप्शन देत रोहित पवार यांनी ट्विटरवर या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदन येथे येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला . ‘ मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट लपलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही. पण म्हणून आमचं नातं तुटलेलं नाही. मी मोदींना भेटलो म्हणजे काही तरी चूक केलं असं नाही. मी काही नवाब शरीफांना भेटलो नाही. आताही माझ्या सहकाऱ्यांना सांगून मी मोदींना भेटायला जाऊ शकतो’, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे मात्र याचदरम्यान मोदींना देखील टोला हाणला आहे कारण मोदी सर्व प्रोटोकॉलचे उल्लंघन करत नवाब शरीफ यांना भेटायला गेले होते .

अजित पवार या भेटीबद्दल बोलताना म्हणाले, ‘ जीएसटी काऊन्सिलमध्ये अनेक वेळा आम्ही सांगितलंय, या अगोदरही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी याच मुद्द्यावरून पत्रव्यवहार केला आहे, आजही पंतप्रधानांच्या कानावर टाकलं, महाराष्ट्राला 24 हजार 306 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा मिळणे बाकी आहे. कोरोनाचे संकट सगळ्या देशावर आणि राज्यांवर आहे, आम्हाला माहिती आहे. परंतु अशाही काळामध्ये परंतु आर्थिक दिलासा देणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे राज्याचे पैसे जर लवकरात लवकर मिळाले तर बरं होईल, असं अजित पवार म्हणाले.


शेअर करा