बेटा..अब शिवसेना का पॉवर हैं उडा दूंगा धमकावणाऱ्या खंडणीबहाद्दर शिवसेनेच्या शहरप्रमुखाची हकालपट्टी

शेअर करा

पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण आता बहुतांश सर्व ठिकाणी दुर्दैवाने दिसते मात्र सत्ता हातात असताना पैशासाठी कोणत्या थराला जायचे याचे नेत्यांना भान राहत नाही. अशाच शिवसेना नागपूर शहरप्रमुख मंगेश कडव याची आज शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. कालच हा हकालपट्टीचा निर्णय वरिष्ठांकडून घेण्यात आला . गुरुवारीच मंगेश कडव याने अत्याचार केल्याची नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेकडे केली होती. मंगेश कडव सध्या फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत .

शिवसेना नागपूर शहरप्रमुख मंगेश कडव याच्याविरुद्ध खंडणी, ठार मारण्याची धमकी, फसवणूक, अत्याचार केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत मात्र पक्षाकडून कोणतीच कारवाई होत नव्हती. राज्यात सरकार असल्याने त्याला पाठबळ मिळत असावे अशी देखील शहरात चर्चा होती. मोठ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असूनही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे मत शिवसेनेच्या विरोधात तयार होऊ लागले होते. अशातच शिवसेनेने त्याच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला असून शिवसेना नागपूर शहरप्रमुख मंगेश कडवं याचा शोध सुरु आहे .

गुरुवारी एका तरुणीने शिवसेना नागपूर शहरप्रमुख मंगेश कडवविरुद्ध गुन्हे शाखेकडे तक्रार केली. कडव याने आपल्यावर अत्याचार केल्याचे पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. खंडणी, ठार मारण्याची धमकी, फसवणूक याच्याही पुढे जाऊन आता अत्याचाराचा गुन्हा नोंदवल्याने मंगेश कडव याच्या अडचणी वाढल्या आहेत तसेच कडव यास पाठिशी घालणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.कडव याच्यासह युवा सेनेचा जिल्हा प्रमुख विक्रम राठोडही आठ लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात चर्चेत आला आहे.

घर बळकावण्याचे प्रकरण : हैदराबाद येथील विक्रम मधुकर लाभे (वय ४७) यांचा भरत नगरमधील पुराणिक ले-आऊट येथे बंगला आहे. या बंगल्यावर मंगेश कडव व त्याच्या साथीदारांनी बळजबरीने ताबा घेतला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने व दैनंदिन वापराच्या वस्तू गायब केल्या. प्रकरण लाभे यांच्या कानी पडताच ते घरी आले आणि कडवं यास जाब विचारला तर कडव व त्याच्या तीन साथीदारांनी लाभे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. घर हवे असल्यास दीड कोटी रुपयांची खंडणी दे अशी मागणी केली. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी कडव व त्याच्या साथीदारांविरुद्ध घरफोडी व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

मंगेश कडव

बिल्डरची फसवणूक प्रकरण : बिल्डर देवानंद बाबासाहेब शिर्के (वय ४८,रा. सक्करदरा) यांनी मंगेश कडव याच्यासोबत रघुजीनगरमधील दुकान १८ लाख रुपयांना खरेदी करण्याचा व्यवहार केला. शिर्के यांनी कडव याला धनादेश व रोख असे १५ लाख रुपये दिले. रजिस्ट्रीच्या वेळी साडेतीन लाख रुपये देण्याचे ठरले होते मात्र दरम्यान मंगेश कडव याने हे दुकान बँकेत ५० लाखांना गहाण ठेवले. शिर्के यांनी पैसे परत मागितले असता शिर्के यांना ठार मारण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांची खंडणी मागितली. ‘बेटा, अब शिवसेना का पॉवर हैं, मेरी मुंबई और दिल्ली तक पहुँच है. तेरी अख्खा फॅमिली को उडा दूंगा’, अशा शब्दांत कडवने धमकावल्याचे शिर्के यांनी सक्करदरा पोलिसांत केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

शिवसेना नागपूर शहरप्रमुख मंगेश कडव विरुद्ध आणखी देखील प्रकरणे आता बाहेर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शहरातील बड्या नेत्याच्या जवळचा असल्याने कडवविरुद्ध कारवाई होत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नागपूरच्या ब्लॅकमेलर प्रीती दासनंतर मंगेश कडव याच्याही गुन्हेगारी जगताचा पाढा आता नागपुरात वाचला जात आहे. आपल्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून कोटींमध्ये खंडणी मागण्याचे प्रकार मंगेश कडव याने केलेले असल्याने आता नि:पक्षपातीपणाने पोलिसांनी कारवाई करावी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये अशी नागरिकांची अपेक्षा आहे .


शेअर करा