खळबळजनक.. पुण्यातील पाण्यातही सापडला कोरोनाव्हायरस : वाचा पूर्ण बातमी

  • by

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली हा मोठा दिलासा असला तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. दुसऱ्या लाटेचं संकट कायम आहेच, शिवाय तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जाते आहे. कोरोनाव्हायरस फक्त पृष्ठभागामार्फतच नाही तर हवेतूनही पसरतो हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान आता सांडपाण्यातही कोरोनाव्हायरस सापडलेला आहे. उत्तर प्रदेश पाठोपाठ आता पुण्यातील सांडपाण्यात कोरोनाव्हायरस सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे

पुणे महापालिकेने आणि नॅशनल केमिकल लेबोरेटरी यांनी पुण्यातील सांडपाण्याचा एकत्रित अभ्यास केला होता. सांडपाण्यातून कोरोनाचं निदान करण्यासाठी त्यांनी डिसेंबर 2020 पासून एक प्रकल्प राबवला. या अंतर्गत शहरातील वेगवेगळ्या भागातून सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले. पुणे महापालिकेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र , एनसीएलच्या कॅम्प्समधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि नदीत सोडलं जाणारं सांडपाणी या ठिकाणचे नमुने घेण्यात आले. पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून जवळपास 23, एनसीएल कॉलनीतल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून 9 आणि नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचे 17 नमुने घेण्यात आले. RT-qPCR पद्धतीने या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती .

प्रकल्पाचे समन्वयक शास्त्रज्ञ डॉ. महेश धरणे यांनी ‘ या प्रकल्पात आम्हाला सांडपाण्याच्या नमुन्यात कोरोना विषाणू असल्याचं दिसून आलं आहे ‘ असे सांगितल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. ‘ पोलिओच्या महासाथीवेळी अशा पद्धतीने सांडपाण्याची तपासणी करण्यात आली होती. एखाद्या भागात आजाराचा संसर्ग किती प्रमाणात झाला आहे, हे तपासण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात आला. आता कोरोनाचा संसर्ग तपासण्यासाठीदेखील सारख्याच पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे ‘,असं डॉ. धरणे यांनी पुढे सांगितले.

कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत नसतील तर सांडपाण्याचे नमुने तपासून कोरोनाव्हायरसचं सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करण्यास ही पद्धत खूप फायदेशीर ठरेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यापूर्वीच उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील पीजीआय विविध ठिकाणच्या सांडपाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली. तिथंही सांडपाण्यामध्ये कोरोना विषाणू सापडला होता.

पीजीआय मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉक्टर उज्वला घोषाल यांनी सांगितलं, काही काळापूर्वी पीजीआयमधील रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. तेव्हा रुग्णाच्या मलात असलेला विषाणू पाण्यात पोहचू शकतो, ही बाब समोर आली. यावरून सर्वच कोरोनाबाधित रुग्णांच्या मलातील विषाणू शौचालयांमधून निघणाऱ्या सांडपाण्यात पोहोचला असेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आणखी काही शोधनिबंधांतूनही 50 टक्के रुग्णांच्या मलातून हा विषाणू सांडपाण्यापर्यंत पोहोचला असल्याची बाब समोर आली आहे.