रेखा जरे यांची हत्या ‘ त्या ‘ प्रेमसंबंधातूनच, पोलिसांकडून अनेक बाबी उघड

  • by

प्रेमप्रकरणातून वारंवार झालेले वाद आणि त्यातून होणाऱ्या बदनामीच्या भीतीतून दैनिक सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ बोठे याने यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या केल्याचे अखेर पोलिस तपासात समोर आले आहे. नगर शहरात या प्रकरणाची कुजबुज सुरु होतीच मात्र त्यावर आता पोलिस खात्याकडून देखील शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. रेखा जरे खून प्रकरणात दाखल केलेल्या पुरवणी दोषारोप पत्रात हत्येचे हेच कारण असल्याचे नमूद केले आहे, असे तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले

उपअधीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी पारनेर येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपी बाळ जगन्नाथ बोठे ( राहणार नगर ) याच्यासह जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अजय चाकली, पी अनंतलक्ष्मी , व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ ( सर्व राहणार हैदराबाद ) व नगर येथील महेश वसंतराव तनपुरे (रा. नगर ) यांच्या विरोधात 450 पानाचे दोषारोपपपत्र दाखल केले आहे. बोठे याच्याविरोधात कट रचून हत्या करणे तर उर्वरित सहा जणांच्या विरोधात फरार आरोपीला मदत करणे असा दोष ठेवण्यात आलेला आहे.

बोठे याने 30 नोव्हेंबर 2020 रोजी सुपारी देऊन रेखा जरे यांची नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट येथे हत्या घडवून आणली होती. या घटनेनंतर पोलिसांनी दोघा मारेकर्‍यांसह एकूण पाच जणांना अटक केली होती. या आरोपीविरोधात 26 फेब्रुवारी रोजी दोषारोपपत्र दाखल झाले होते मात्र या घटनेनंतर मुख्य आरोपी बाळ बोठे हा फरार झाला होता 13 मार्च रोजी पोलिसांनी बोठे याला हैदराबाद येथून अटक केली होती व सोबतच त्याला मदत करणाऱ्या पाच आरोपींना देखील अटक करण्यात आली होती.

पुरवणी दोषारोपपत्रात गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी 26 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत तर रेखा जर यांची हत्या झाली तेव्हा कारमध्ये त्यांची आई मुलगा व एक महिला प्रशासकीय अधिकारी हे देखील साक्षीदार आहेत, तसेच पैशाच्या देवाणघेवाणीचे सीसीटीव्ही फुटेज, बोठे याचे कॉल डिटेल्स, जरे यांच्या घरातून मिळालेले पत्र तसेच आधीच्या दोषारोपपत्रात तब्बल 90 जणांचे नोंदवलेले जवाब अशा भक्कम पुराव्यांची जंत्री सादर करत पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.

काय आहे प्रकरण ?

रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जातेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेत घातपाताचा देखील संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता तसेच घडलेले कारण हे तात्कालिक नसावे तर हा पुर्ननियोजीत कट असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती आणि अखेर ती खरी ठरली.

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे जरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बोठे देखील हजर होता तेव्हापासूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. दरम्यान याच गुन्ह्यातील इतर आरोपीना अटक होताच बोठे फरार झाला . दरम्यान या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला होता .

३० नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या झाली होती. गुन्ह्यात नाव आल्यापासून बोठे फरार झाला. काही दिवस इतत्र राहिल्यानंतर याने हैदराबाद गाठले. पूर्वी त्याने याच भागातील उस्मानिया विद्यापाठातून पीचएडी मिळविलेली आहे. त्यावेळी तेथील जर्नादन अकुला चंद्राप्पा (रा. सारोमानगर, रंगारेड्डी, हैद्राबाद, तेलंगाना) या वकीलाशी त्याची ओळख झाली होती. गुन्हेगारांना मदत करण्यासाठी हा वकील परिसरात फेमस आहे त्याने बोठे याला मदत केली.

बाळ बोठे याने मदत हवी म्हणून वकिलांकडे याचना केली. पोलिसांना पक्की खबर मिळाली तेव्हा पोलिस याच भागातील प्रतिभानगर परिसरातील एका हॉटेलवर गेले. त्यातील रूम नंबर १०९ मध्ये बोठे लपून बसल्याची माहिती पोलिसांना होती. मात्र, रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी बोठे याने तेथे बी. बी. पाटील या नावाने बुकिंग केलेले होते. ओळख लपविण्यासाठी तो दाढी वाढवून आणि वेष बदलून वावरत होता. मात्र, तो तेथेच असल्याची माहिती पक्की असल्याने पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि बोठे पकडला गेला.

बाळ बोठे याला पकडले त्यावेळी तो रूममध्ये एकटाच होता. त्याला मदत करणारा चंद्राप्पा, राजशेखर अंजय चाकाली (वय २५ रा. गुडुर करीम नगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय ३० रा. बालापुर, सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (वय ५२, रा. चारमीनार मस्जीद, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश) यांनाही अटक करण्यात आली .

बोठे याच्या खोलीतून काही मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली . फरार असल्याच्या काळात त्याने अनेक मोबाईल वापरले. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांत सुमारे शंभरहून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबविली. हैदराबादमध्ये तीन दिवसांपासून कारवाई सुरू होती. तेथेही तीन ठिकाणांहून पोलिस पोहचण्यापूर्वी पळून जाण्यात तो यशस्वी झाला होता.

पोलिसांनीही अत्यंत गोपनीयता पाळत मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस सायबर सेलची मदत घेऊन सूत्रबद्धरित्या तपास केला. जरे यांनी बोठेबद्दल पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. त्या गुन्हाही दाखल करण्याच्या तयारीत असल्याने आणि त्यातून आपली बदनामी होऊ नये, या कारणावरून बोठे याने सुपारी देऊन जरे यांची हत्या घडवून आणल्याचे तपासात उघड झाले आहे. पाच आरोपी यापूर्वीच अटक करण्यात आले आहेत. आता त्याला मदत करणारे आणखी कोणी उघड झाले, तर त्यांनाही अटक केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले होते.

आरोपी सागर भिंगारदिवे याच्यामार्फत बाळ बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानंतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारेही जरे यांच्या हत्येचा बोठे हाच सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते . मधल्या काळात त्याने अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयातही तो फेटाळण्यात आला. मधल्या काळात पोलिसांनी त्याला फरार घोषित केले. पारनेर येथील न्यायालयाने त्याला फरार घोषित करून ९ एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर पोलिस बोठे याची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करणार होते. त्याधीच त्याला अटक झाली होती.

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता. रेखा जरे यांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतरही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने रेखा जरे यांचे कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले होते. रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याच्या विरोधात पारनेर येथील न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले होते. त्याविरोधात बोठेने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी ही मागणी फेटाळून लावल्यामुळे बाळ बोठेविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला होता.

नगर येथील रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला फरार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला होता . त्याला पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती मात्र त्याच्या आतच पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांची पाच पथके बाळ बोठे याचा शोध घेत होती. पोलिसांनी रेखा जरे यांच्या घराची,तसेच या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे व बोठे याच्या घराची झाडाझडती घेतली होती आणि काही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली होती .

बाळ बोठे याने काही दिवसापूर्वी नगर इथे हनी ट्रॅपचे रॅकेट कसे कार्यरत आहे याबद्दल एक मालिका छापली होती. त्या मालिकेत कसे धनदांडगे सावज हेरून जाळ्यात ओढले जाते आणि नंतर माहितीतील पोलिसांची मदत घेत धाड घालून कशा पद्धतीने ‘ मांडवली ‘ केली जाते याचा लेखाजोखा देखील दिला होता, अर्थात ही माहिती बोठे यांच्यापर्यंत कशी पोहचत होती हे मात्र गूढ आता बोठे ताब्यात आल्याने उकलण्यात येईल का ? याचे उत्तर नगरकरांना आता हवे आहे .

नगर शहरात असलेल्या या कथित हनी ट्रॅपमध्ये कोण कोण सहभागी आहेत याचाच पोलीस सध्या शोध घेत आहेत तसेच रेखा जरे यांच्या खुनाशी देखील हनी ट्रॅप निगडित आहे का ? अशा अँगलचा देखील शोध सुरु आहे . नाजूक विषय असल्याने कोणी पुढे येऊन पोलिसांना मदत करण्यास धजावत नाही तसेच ‘ झाकली मूठ सव्वा लाखाची ‘ अशा रीतीने मोठी धेंडे देखील बदनामीपोटी गप्प आहेत. नगरमधील जाखणगाव इथेही एक हनी ट्रॅप प्रकरण उघडकीस आले असल्याने त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध आहे का ? याचीही चौकशी करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे .