नगरमध्ये चाललंय काय ? आधी महिला पोलिसाचा विनयभंग आता ‘ ऑडिओ क्लिप ‘ व्हायरल

  • by

मागील दोन दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात राजूर पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस कर्मचार्‍याचा पोलीस हवालदाराने विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेत एक पोलिस आपल्या साथीदाराला विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

अकोले पोलिस ठाण्यात एका पोलिसाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना घडल्यानंतर काही दिवसातच राजूर पोलीस ठाण्यात एका हवालदाराने महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग केला. यानंतर तिसऱ्याच दिवशी राजूर पोलिस स्टेशनचे कर्मचारी एकमेकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या प्रयत्नात असल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे.

सदर क्लिपमध्ये एक पोलिस कर्मचारी किरण नावाच्या व्यक्तीच्या पत्नीला हाताशी धरून पोलीस स्टेशनमध्ये वरचढ ठरत असलेल्या एका कर्मचारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा सल्ला समोरच्या इसमाला देत आहे. कुणाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायचा याचे नावही या क्लिपमध्ये विचारण्यात आलेले आहे. राजुर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांमध्ये अशी भयंकर गटबाजी उघडकीस आल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. नगर चौफेर या क्लिपमधील सत्यतेची पुष्टी करत नाही मात्र या क्लिपने वातावरण चांगलेच तापलेले पहायला मिळत आहे .