… अखेर डॉक्टर अनिल बोरगेंवर महापालिका आयुक्तांची ‘ धडाकेबाज ‘ कारवाई

शेअर करा

लॉकडाऊन सुरू असताना सर्व नियम धाब्यावर बसवत एका निवासस्थानी आणि चक्क दालनात सुद्धा वाढदिवसाची पार्टी साजरी केल्याने अडचणीत आलेले महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्यावर मनपा आयुक्तानी कारवाईचा बडगा उगारला असून बोरगे यांना अखेर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले आहे. कोरोना रुग्णालयांना परवानगी देताना देखील नियमांचे पालन केले नाही याच्यासह सतरा प्रकारचे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी असताना डॉक्टर बोरगे हे अनेक बाबतीत अपयशी ठरले, असे आयुक्त शंकर गोरे यांनी आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. कर्मचाऱ्यांची गर्दी जमवून आपल्या दालनात व निवासस्थानी बोरगे गाणे गात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. नगरकर कोरोनाने दम तोडत असताना याप्रकरणी समाजातून विविध स्तरातून संताप व्यक्त झाला. बोरगे यांना प्रशासनाने नोटीसही बजावली होती मात्र त्यांनी मुदतीत कोणताही खुलासा केला नाही.

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेही बोरगे यांच्या संदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यांनी बोरगे यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश मनपा आयुक्तांना दिला असल्याचे समजते. आयुक्तांनी मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भात अहवाल मागवला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बोरगे हे याआधी देखील अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेले आहेत. ते निलंबितही झाले होते. मध्यंतरी एका महिला कर्मचाऱ्याच्या मुलाने केलेल्या तक्रारीमुळे ते वादग्रस्त ठरले होते त्यानंतर पुन्हा त्यांच्या दालनात रेमडेसिव्हर इंजेक्शन सापडल्या प्रकरणे देखील पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे.

नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्यावरही कारवाई करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाला पाठवलेला आहे. सुनील पोखरणा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीला अनुपस्थित राहिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतरही नंतरही डॉक्टर पोखरणा आहे त्या पदावर कायम आहेत त्यामुळे त्यांचा पाठीराखा कोण आहे ? याचीही शहरात चर्चा सुरु आहे . कोरोना प्रादुर्भाव असतानादेखील प्रशासकीय अधिकारी किती बेजबाबदारपणे वागत आहेत हेच या घटनांवरून स्पष्ट झाले आहे .

बोरगे प्रकरण नक्की काय आहे ?

महापालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने कोविडचे सर्व नियम धुडकावत वाढदिवसाची जंगी पार्टी सादर साजरी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.. कोरोना काळात इतरांना सोशल डिस्टंसिंगचे नियम शिकवणारे अधिकारीच स्वतः असे धक्कादायक प्रकार करत असल्याने सामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरून कायद्याचा बडगा दाखवणारे महापालिकेचे आयुक्त या पार्टीवर काय कारवाई करणार ? याची उत्सुकता नगरकरांना लागून राहिली होती .

महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे एका निवासस्थानी ‘ एक हसीना थी ‘ हे गाणे तालासुरात गाताना या व्हिडिओत दिसत होते . लॉकडाऊनचे सर्व नियम तोडून काही महिला व पुरुष देखील या पार्टीत सहभागी झालेले दिसत होते . काहींच्या गळ्यात मास्क नावापुरते लटकवलेली दिसत होती, हा व्हिडीओ कोविड काळातलाच असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते.

या व्हिडिओत हा अधिकारी ‘ पल पल दील के पास वो रहती है’ असे रोमँटिक गाणे गाताना दिसत आहे. त्याच्या टेबलवर बुके दिसत असून दोन्ही व्हिडिओ एकाच दिवशीचे असल्याचा अंदाज आहे. कोरोना काळात नागरिकांचे आरोग्य जपणे ही महापालिकेची जबाबदारी आहे मात्र अशावेळी आरोग्य अधिकारी देखील गाण्यात आणि पार्टी करण्यात व्यस्त असल्याचे या व्हिडीओनंतर उघड झाले होते .

गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध कृतीने वादग्रस्त ठरलेले महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना तातडीने बडतर्फ करावे अन्यथा या अधिकाऱ्याच्या पुतळ्याचे अंत्यसंस्कार मनपाच्या दालनासमोर करू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला होता . प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना याबाबत निवेदन दिले होते

डॉक्टर अनिल बोरगे अनेक दिवसांपासून नगर मनपात कार्यरत असून महापालिकेतील त्यांचा कारभार सतत वादग्रस्त ठरलेला आहे. शहरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे वेळेवर अंत्यसंस्कार न करणे , स्वतःच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता एका दालनात अनेक पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना एकत्र करून गाण्यावर थिरकणे , स्वतःच्या कार्यालयात गाणे शूट करून ते पसरवणे, उत्कृष्ट काम करणार्‍या आशा कामगार महिलांचे वेळेवर पगार न करणे, मातृत्व वंदना योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ न देणे, कोरोना पीडितांनी त्यांना कामानिमित्त फोन केल्यास कोणतेही उत्तर न देणे, बोल्हेगाव येथील मनपा महिला कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन पार्टी करत असताना 14 वर्षीय मुलाला मद्यप्राशन करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, असे अनेक प्रकार या अधिकाऱ्याने पूर्वीही केलेले आहेत, असे निवेदनात म्हटलेले होते .


शेअर करा