मानवी तस्करीचा ‘असाही ‘ एक प्रकार आला उघडकीस

  • by

सहा महिन्यांचं बाळ जे काही बोलू शकत नाही, त्याची चोरी करुन त्यांना वाटलं की, कुणाला कानोकान खबर लागणार नाही. मात्र या चोरट्यांचा पर्दाफाश तिसरा डोळा असलेल्या सीसीटीव्हीने केला. कल्याण स्टेशन परिसरातून बाळाची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. या चोरट्यांनी यापूर्वी अशाप्रकारे किती बाळांची चोरी केली आहे तसेच त्यांचे पुढे काय केले ? याचा तपास पोलीस करत आहेत

कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात बेघर असलेले अनेक दाम्पत्य रस्त्यावरच झोपतात. यापैकीच एक सुनिता राजकुमार नाथ ही महिला सहा मुलांना घेऊन झोपली होती. त्यापैकी तिचा सगळ्यात लहान असलेला सहा महिन्यांचा मुलगा जिवा याची चोरी झाली. सुनिताने आपली व्यथा महात्मा फुले पोलिसांना सांगितली. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संभाजी जाधव, पोलीस अधिकारी प्रकाश पाटील, दीपक सरोदे आणि ढोले यांच्या पथकाने या बाळाचा शोध सुरु केला

सीसीटीव्हीत दोन चोरटे या बाळाला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावली. मात्र त्यांचा गुन्हेगारीचा पूर्व इतिहास नसल्याने शोध घेण्यासाठी मोठे आव्हान होते. अखेर पोलिसांच्या कामी सीसीटीव्हीचे फूटेज आले. अखेर पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या. आंबिवलीत राहणारा आरोपी विशाल त्र्यंबके आणि दिव्यात राहणारा आरोपी कुणाल कोट यांनी त्या बाळाची चोरी केली होती. हे दोघं सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहेत.

काही दिवस हे बाळ आरोपी कुणाल कोट याच्या पत्नी आरतीकडे होते. त्यानंतर या बाळाला भिवंडीत राहणाऱ्या हिना मजीद आणि फरहान मजीद या जोडप्याला देण्यात आलं. या जोडप्याने दोघं तरुणांना बाळाच्या बदल्यात एक लाख रुपये देण्याचे ठरवले होते. पोलिसांनी हिनाची जेव्हा चौकशी केली तेव्हा तिने उडवाउडवीचे अनेक उत्तरे दिली. सुरुवातीला तिने मुलगा नसल्याने त्याला दत्तक घेतल्याचं सांगितलं.

विशेष म्हणजे हिनाने याआधी टेस्टट्यूब बेबीने बाळाला जन्म देऊन साडे पाच लाख रुपयात विकलं होतं. यावेळी तिने टेस्टट्यूब बेबीचा प्रयोग न करता चोरलेल्या बाळ आयतंच खरेदी करुन विकायचे हे फरहान आणि हिनाने ठरविले होते. दोघे मुंबईत नेमकं कोणत्या दांपत्याला विकणार होते, याचा तपास पोलीस करत असून मानवी तस्करीचा हा देखील एक प्रकार या निमित्ताने उघड झाला आहे .