काही दिवसांपूर्वी नागपूर इथे काहीतरी वेगळं म्हणून सेक्स करण्याच्या पोजीशनमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता . देशात आणि परदेशात असे अनेक प्रकार घडलेले आहेत मात्र आता ब्रिटनमध्ये यावर कडक कायदा करण्यात आला असून आता सेक्स करताना जोडीदाराचा गळा आवळल्यानं किंवा श्वास कोंडल्यानं मृत्यू झाल्यास तो घरगुती हिंसाचाराच्या नवीन कायद्याअंतर्गत गुन्हा ठरणार आहे.ब्रिटनमध्ये हत्या होणाऱ्या महिलांपैकी प्रत्येकी तिसऱ्या महिलेचा मृत्यू हा गळा आवळल्यानं किंवा श्वास कोंडल्यामुळं होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे .
डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील दर पाचपैकी एक बळी हा जोडीदारानं सेक्सदरम्यान गळा आवळल्यानं किंवा श्वास रोखल्यामुळे जात असल्याच्या पुराव्यांच्या आधारावर सामाजिक कार्यकर्त्यानी या नवीन कायद्याचा प्रस्ताव मांडला होता. सर्वसाधारण स्थितीत श्वास कोंडणे किंवा गळा आवळला गेल्यानं मृत्यू झाल्यास सध्याच्या सर्वसाधारण प्राणघातक हल्ला कायद्याअंतर्गत त्यासाठी जास्तीत जास्त सहा महिन्यांची शिक्षा आहे. संमतीनं होणाऱ्या सेक्सदरम्यान श्वास रोखला गेल्यानं मृत्यू झाल्याचा दावा गुन्हेगार करतात आणि त्यांची सुटका होते, असं घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी कार्यरत समूहानं म्हटलं आहे.
2018 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यास अहवालानुसार, ब्रिटनमध्ये पुरुषांच्या तीन टक्के हत्यांच्या तुलनेत दर तिसऱ्या महिलेचा मृत्यू हा गळा आवळल्यानं किंवा श्वास रोखल्यानं होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये चाकूनं भोसकल्यानं होणाऱ्या मृत्यूपेक्षा सेक्सदरम्यानचा हिंसाचारानं मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक आहे, त्यामुळे या संदर्भात कठोर कायदा करण्याची गरज निर्माण झाली होती.
मँचेस्टरमधील सेंट मेरीज सेक्श्यूअल असॉल्ट रेफरल सेंटरचे संचालक डॉ. कॅथरीन व्हाईट यांच्या सांगण्यानुसार, प्रत्येक पाचव्या महिलेवर त्यांच्या जोडीदाराकडून बलात्कार होत असतो. आणि त्या महिलांच्या सांगण्यानुसार त्यांना श्वास गुदमरून जीव जाईल इतका खुनशीपणा अनुभवाला येतो. सध्याचा कायदा अशा गुन्ह्यांसाठी अपुरा आहे, त्यामुळं त्यात सुधारणा आवश्यक असून, त्यामुळं लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल.
आयुक्त निकोल जेकब्स आणि व्हिक्टीम्स कमिशनर डेम व्हेरा बेआर्ड न्याय विभागाच्या सचिव रॉबर्ट बकलँड यांची भेट घेऊन आपल्या प्रस्तावाबाबत चर्चा करणार आहेत. जीवघेण्या पद्धतीनं गळा आवळणे आणि श्वासोच्छ्वास रोखणे हे भयानक अनुभव असतात, असं त्यांनी संयुक्तपणे जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सुटलेले लोक आणि बळी जाणारी लोकं, हे या कायद्याचं अपयश आहे. जीवघेण्या पद्धतीनं सेक्स करणं आणि जोडीदाराचा बळी घेण्याचा प्रकार खुनाच्या इतर गुन्ह्यांपेक्षा कमी नाही. अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.