‘ मृत व्यक्ती स्वप्नात येऊन बोलतात ‘, कोविडनंतर ‘ ह्या ‘ गूढ आजाराने डॉक्टरही हैराण

  • by

2019 मध्ये चीनमधील वुहान इथून कोरोनाचा संसर्ग झाला असे सांगण्यात येत असले तरी अजूनही अनेक गोष्टींचा खुलासा होऊ शकलेला नाही. अत्यंत वेगाने पसरलेला हा विषाणू लॅबमध्ये तयार झाला असावा, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोनाचा कहर जगभर सुरूच असतानाच कॅनडामध्ये आढळणाऱ्या एका विचित्र रहस्यमय आजारामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. वैज्ञानिकांना या नव्या आजारानं गोंधळात टाकलं असून त्यावर संशोधन सुरू आहे. तब्बल ४८ रुग्णामध्ये समान आणि विचित्र लक्षणे आढळून आल्याने खळबळ उडालेली आहे .

कॅनडातील न्यू ब्रुन्सविक प्रांतात या आजाराचे रुग्ण सापडले असून या रुग्णांमध्ये कमालीचा थकवा, डोकेदुखी तसंच अन्य विचित्र लक्षणं दिसून आली आहेत. मृत झालेल्या व्यक्ती स्वप्नात येऊन बोलत असल्याचं काहींनी सांगितलं. कॅनडातील न्यू ब्रुन्सविकमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक असे 48 रुग्ण रहस्यमय आजाराने पीडित असल्याचं आढळून आलं आहे.

कोरोना होऊन गेल्यानंतर या लोकांना भ्रम होत असून ते विचित्र लोकांना पाहिल्याचं सांगत आहेत. सुमारे 7 लाख 70 हजार लोकसंख्या असलेल्या या भागात या रहस्यमय आजाराने 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या आजाराने ग्रस्त रुग्णांची तपासणी केली असता त्यांना कोणताही शारीरिक त्रास नसल्याचं आढळून आलं असल्याने अद्यापही ह्या आजाराचे गूढ कायम आहे .

न्यूयॉर्क टाईम्सने या रहस्यमय आजाराचं वृत्त प्रसारित केलं आहे. 4 जून रोजीच्या वृत्तानुसार, डॉक्टर्स, संशोधक सातत्याने या आजाराविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र याबाबत अद्याप ठोस अशी माहिती हाती लागलेली नाही. सर्व रुग्णांच्या तक्रारीही एकसमान आहे, हेही आश्चर्यच आहे. रुग्णांमध्ये युवकांचं प्रमाण अधिक आहे.

बट्रेंड शहराचे महापौर यवोन गॉडीन यांनी सांगितलं आहे की , ‘ हा आजार मोबाईल टॉवर्सच्या रेडिएशनमुळे उद्भवला आहे का? विशिष्ट प्रकारच्या मांस सेवनामुळे हा आजार होतोय का ? ‘ याचा तपास सुरु आहे . काही लोक कोरोना प्रतिबंधक लशीला यासाठी जबाबदार धरत आहेत. मात्र याला काही ठोस पुरावा नाही. कारण लसीकरण झालेले लोकच सुरक्षित आहेत. मात्र दुसरा पैलू असा आहे, की या रहस्यमय आजाराचे काही रुग्ण गेल्या 6 वर्षातही दिसून आले आहेत. मात्र सध्या ही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे.

सुरुवातीला या विचित्र आजाराविषयी फारशी कोणाला कल्पना नव्हती. मात्र मार्चमध्ये न्यू ब्रुन्सविक प्रांतातील मुख्य आरोग्य अधिकाऱ्याचा एक मेमो लीक झाला आणि याची माहिती माध्यमांना मिळाली. त्यानंतर या विचित्र आणि अज्ञात आजाराविषयी चर्चा सुरू झाली. विचित्र आकृत्या किंवा मृत झालेल्या व्यक्ती दिसत असल्याने हा आजार मज्जातंतूंशी निगडीत असावा, असं मानलं जात आहे. जगातील अनेक संशोधक, वैज्ञानिक आता या आजाराचा शोध घेण्यात गुंतले आहेत.

2016 मध्ये क्युबामध्ये तैनात असलेल्या काही अमेरिकी राजदूतांनी विचित्र आवाज ऐकू येत असल्याची आणि त्यानंतर आजारपण आल्याची तक्रार केली होती. यातील काही अधिकाऱ्यांनी ऐकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता गमावली. या रहस्यमय आजाराला हवाना सिंड्रोम असं म्हटलं गेलं. या राजदूतांबरोबरच क्युबा, चीनसह अन्य काही देशांमध्ये असलेले अमेरिकी गुप्तचर विभागाचे लोकही या विचित्र आजाराच्या विळख्यात सापडले होते. या आजारात त्यांना कधीही न ऐकलेले आवाज ऐकू येत होते. शारीरिक बदल होत होते. तीव्र डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या होत होत्या. तसंच रुग्णाची बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमता कमी झाली होती. म्हणजेच या आजाराचा परिणाम मज्जातंतूंवर होत होता.

क्युबा देशामधून बाहेर पडल्यानंतर काही लोकांची प्रकृती सुधारल्याचं दिसून आलं. मात्र काही लोकांची प्रकृती अधिकच बिघडल्यानं त्यांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी अन्य व्यक्तीवर अवलंबून राहावं लागलं. नॅशनल अॅकॅडमिक्स ऑफ सायन्सेसनं हा क्युबा, रशिया किंवा अन्य शत्रू राष्ट्रांनी सोनिक हल्ला केल्याचं मानून या दृष्टीनं तपास केला होता. हे मायक्रोवेव्ह रेडिएशन असल्याचं एनएएस मानतं. हे रेडिएशन जाणीवपूर्वक अमेरिकी अधिकाऱ्यांना आजारी पाडण्यासाठी सोडण्यात आल्याचंही मानलं जातं.