ब्रेकिंग..डेल्टानंतर पुण्यात कोरोनाचं आणखी एक भयंकर रूप, सापडला सर्वात घातक स्ट्रेन

  • by

सध्या भारतात कोरोनाचा डेल्टा म्हणजे B.1.617.2 व्हेरिएंट सर्वात घातक असल्याचं सांगितलं जातं आहे. याच दरम्यान आता डेल्टाप्रमाणेच घातक असा आणखी एक नवा व्हेरिएंट सापडला आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोललॉजीमध्ये व्हायरसचं जिनोम सिक्वेंसिंग करून B.1.1.28.2 या नव्या व्हायरसचं निदान करण्यात आलं आहे.

B.1.1.28.2 हा नवा व्हेरिएंट भारतातील डेल्टा व्हेरिएंटसारखाच गंभीर आहे. हा व्हेरिएंट यूके आणि ब्राझीलहून भारतात परतलेल्या लोकांमध्ये सापडला आहे. हा व्हेरिएंट संक्रमितांमध्ये गंभीर लक्षणं निर्माण करतो, असं सांगण्याच आलं आहे. नवीन आलेल्या या माहितीने आणखीनच चिंता वाढवली असून अनलॉकचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा आहे .

NIV ने या व्हेरिएंटचा अभ्यास करून दिलेल्या माहितीनुसार, हा व्हेरिएंट गंभीर रूपाने आजारी करू शकतो. यावर लस प्रभावी आहे की नाही, यासाठी स्क्रिनिंग करण्याची गरज आहे. हा अभ्यास bioRxiv मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. तर आणखी एका अभ्यासानुसार कोवॅक्सिन या लशीविरोधात प्रभावी आहे. लशीच्या दोन डोसमुळे अँटिबॉडीज तयार होतात आणि या व्हेरिएंटला न्यूट्रिलाइझ करता येऊ शकतं.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, B.1.1.28.2 व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटसारखाच खतरनाक आहे. अभ्यासानुसार उंदरांवर याचा गंभीर दुष्परिणाम दिसून आल आहे. वजन कमी होणं, श्वसन प्रणालीत व्हायरसच्या प्रतिकृती तयार होणं, फुफ्फुसांमध्ये जखमा होणं आणि हानी पोहोचणं, अशी गंभीर लक्षणं दिसून आली आहेत.

भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळलेल्या B.1.617.2 व्हेरियंटला डेल्टा व्हेरियंट म्हटलं गेलं आहे. तर, दुसऱ्या B.1.617.1 स्ट्रेनचं नामकरण कप्पा (Kappa) असं केलं गेलं आहे. यातील डेल्टा व्हेरियंटचे एक विषाणू स्वरूपच (स्ट्रेन) फक्त घातक असून इतर दोन प्रकारांचा धोका कमी झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने याआधी सांगितलं होतं. हा स्ट्रेन भारतात सर्वात आधी दिसून आला होता.

भारतातील डेल्टा (Delta) व्हेरिएंटसह इतर चिंताजनक व्हेरिएंट्सचं वाढतं संक्रमण पाहता कोरोना प्रतिबंध हटवणं खतरनाक ठरू शकतं. ज्या लोकांना अद्याप कोरोना लस घेतली नाही, त्यांना कोरोना नियमांपासून शिथिलता देणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे कोरोना प्रतिबंध हटवण्याची घाई करू नका, हे धोकादायक ठरू शकतं, असा सल्ला डब्ल्यूएचओने भारताला आधीच दिला आहे.