नगरचे हनी ट्रॅप : ‘ बंगल्यावर या एकदा ‘ म्हणणाऱ्या टोळीबद्दल महत्वाचे अपडेट

  • by

श्रीमंत व्यावसायिकास घरी बोलावून शरीरसंबंध करण्यास भाग पाडून त्याचा अश्लील व्हिडिओ तयार करत लूटमार करून खंडणी मागणाऱ्या टोळीच्या विरोधात नगर तालुका पोलिसांनी बुधवारी नऊ तारखेला जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोप पत्रात महिलेसह तिच्या टोळीच्या अनेक कारनाम्यांचा उल्लेख करण्यात आला असून महिलसह टोळीच्या अडचणी वाढल्या आहेत .

नगर तालुक्यातील जखणगाव येथील तीस वर्षे महिलेसह अमोल सुरेश मोरे ( राहणार कायनेटिक चौक नगर ) व बापू बन्सी सोनवणे ( राहणार हिंगणगाव तालुका नगर ) या तिघांच्या विरोधात 82 पानाचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. शरीर सुखाचे आमिष दाखवून खंडणी ,मारहाण , जबरी चोरी या कलमाअंतर्गत आरोपीच्या विरोधात दोष ठेवण्यात आला असल्याचे तपासी अधिकारी तथा नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या महिलेने तिच्या साथीदारांशी संगनमत करून नगर तालुक्यातील एका श्रीमंत व्यावसायिकाला 26 एप्रिल रोजी जखणगाव येथील तिच्या बंगल्यात बोलावले आणि तिथे त्याला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याच वेळी महिलेच्या साथीदारांनी अश्लील व्हिडिओचे चित्रण केले यानंतर या आरोपींनी व्यावसायिकास मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, सोन्याच्या चार अंगठ्या, 84 हजार तीनशे रुपये रोख असा एकूण पाच लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला तसेच त्याला एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती .

पैसे दिले नाही तर तुझे हे व्हिडिओ पोलिसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणार अशी धमकी देखील दिली. या घटनेनंतर त्या व्यावसायिकाने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 15 मे रोजी सहाय्यक निरीक्षक सानप यांच्या पथकाने महिलेसह अमोल मोरे याला अटक केली होती, पुढे या गुन्ह्यात बापू बन्सी सोनवणे याचा देखील सहभाग आढळल्याने त्याला देखील अटक करण्यात आली.

गुन्ह्याचे तपासी अधिकारी राजेंद्र सानप यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करत तपास सुरू केला. आरोपीने फिर्यादीकडून लूटमार केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहे. आरोपींची जप्त केलेले मोबाईल डिलीट डाटा रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आले आहेत त्यातून आणखी पुरावे देखील न्यायालयात सादर करणार असल्याचे सानप यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ?

नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आरोपींचे अनेक अनैतिक कृत्ये समोर आली आहेत. पैशाचा हव्यास आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना हेरून या महिलेने स्वतःची एक टोळी तयार केली होती बंगल्यात आलेल्या पुरुषांचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल करत पैसे उकळणे अशी जबाबदारी या तरुणांवर होती.

महिलेने तिच्या साथीदाराच्या मदतीने आधी गोड बोलून धनिक व्यावसायिकाला तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ तयार करून त्या आधारे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. नगर तालुक्यातील जखणगाव इथे गावात किराणा दुकान चालविणाऱ्या महिलेने नगर शहरात राहणाऱ्या तिच्या साथिदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे उघड झाले होते . पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली असून त्यांनी फिर्यादीकडून उकळलेला सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्त केला आहे.

शहरातील एका धनिकाला आपल्याला अडकविले जात आहे, हे लक्षात आल्यावर त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही काळातच गुन्ह्याची उकल करून त्या महिलेसह तिचा साथिदार अमोल सुरेश मोरे (वय ३०, रा. कायनेटीक चौक, नगर) याला पकडले. फिर्यादीच्या सांगण्यानुसार २६ एप्रिल रोजी ही घटना घडली. मोरे व त्या महिलेने संगनमत करून फिर्यादीला आपल्या जाळ्यात ओढले. त्या महिलेच्या घरात नेऊन शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडीओ तयार करण्यात आला. फिर्यादीकडील रोख रक्कम, सोन्याची साखळी, आंगठ्या असा सुमारे पाच लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला होता.

त्यानंतर एक कोटी रुपयांची खंडणी दे, अन्यथा या व्हिडिओच्या आधारे पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल करू, अशी धमकी द्यायला सुरवात केली. शेवटी फिर्यादीने पोलिसांना गाठून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे कसून चौकशी केल्यावर तिने आणि मोरे या दोघांनी मिळून हा गुन्हा केल्याचे आढळून आले होते. फिर्यादीला पुरते अडकविण्याची योजना आरोपींनी आखली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने विचारणा करतात चाकूचा धाक दाखविण्यात आला. जास्तच हुशारी केली तर त्याला बांधून ठेवण्यासाठी दोरीही आणून ठेवली होती.

महिलेने तिच्या वाट्याला आलेले दागिने आपल्या भावाच्या नावे एका भिंगार अर्बन बँकेत गहाण ठेवले होते. तेही पोलिसांनी ताब्यात घेतले. बाकीचा मुद्देमाल तिच्या आणि साथिदाराच्या घरातून हस्तगत करण्यात आला. अशा पद्धतीने आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले होते त्यानुसार आणखी एका क्लास वन अधिकाऱ्याने महिलेच्या विरोधात फिर्याद दिली .

पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, आर.एन. राऊत, बापुसाहेब फोलाणे, भगवान गांगडे, शैलेष सरोदे, संतोष लगड, योगेश ठाणगे, अशोक मरकड, धर्मनाथ पालवे, प्रमीला गायकवाड, धर्मराज दहिफळे, संभाजी बोराडे, गायत्री धनवडे, मोहीनी कर्डक, राजश्री चोपडे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.