इंस्टाग्रामवर भगवान शंकराचं आक्षेपार्ह ‘ जीआयएफ ‘ , भाजपकडून चुप्पी

  • by

काही दिवसांपूर्वी गुगलने कन्नड भाषेचा उल्लेख सर्वात कुरुप भाषा असा केला होता. या उल्लेखानंतर सोशल मीडियावर वादंग निर्माण झाला होता. त्यातच भर म्हणून आता इन्स्टाग्रामने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असलेल्या स्टिकर्समध्ये भगवान शंकराच्या हातात वाईन दाखवण्यात आली आहे. या प्रकारानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून याप्रकरणी इन्स्टाग्राविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हिंदुत्वाचा हवाला देणारे भाजप सरकार आता इंस्टाग्राम बंद करण्याची हिम्मत दाखवणार का ? याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लहान लहान गोष्टीवरून ट्विट करणारे नरेंद्र मोदी यांनी देखील या मुद्द्यावर चुप्पी साधली आहे .

“इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये उपलब्ध असलेल्या स्टिकर्समध्ये भगवान शंकर यांच्या हातात द्रव पदार्थ ( कदाचित वाईन) आणि सोबत मोबाईल दाखवण्यात आला आहे. इन्स्टा स्टोरी सर्च बारमध्ये शिव असं टाइप केल्यावर त्यात भगवान शंकरांचं हे आक्षेपार्ह स्टिकर आढळून आलं. हे स्टिकर अद्यापतरी कोणत्याही सोशल मीडिया वापरकर्त्याने पोस्ट केलेलं नाही मात्र तरीदेखील ते इन्स्टा स्टिकर्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. तसंच या स्टिकर्सबाबत यापूर्वीदेखील अनेक युजर्सने तक्रार दाखल केली होती”, असं दाखल करण्यात आलेल्या एका एफआयआर मध्ये म्हटलं आहे तसेच जाणीवपूर्वक हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने हे तयार करण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे .

अनेक सोशल मीडिया अॅप्सवर यापूर्वीदेखील धार्मिक सौहार्द बिघडविल्याचे आरोप करण्यात आला आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक मुद्दे वादाचा विषय ठरले आहेत. अलिकडेच गुगलने ‘कन्नड’ भाषेचा उल्लेख सर्वात कुरूप भाषा म्हणून केला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनवर चक्क कर्नाटकच्या ध्वजाच्या रंगामध्ये महिलांचे अंतर्वस्त्र विक्रीसाठी उपलब्ध केले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे.