.. मग संसदेत केलं ते काय…? ‘ तो ‘ व्हिडिओ शेअर करत नुसरत जहांवर निशाणा

शेअर करा

बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नुसरतने २०१९ साली निखिल जैनसोबत तुर्की येथे लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर नुसरत हातावर मेहंदी, कपाळावर कुंकू लावून आणि साडी नेसून संसदेत आली होती. तिला या पेहरावात पाहताच सगळे चकित झाले होते. तेव्हा नुसरतविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. आता नुसरतने आपलं परदेशात झालेलं लग्न मान्य नसल्याचं म्हटल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नुसरतने तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून लग्नाचे सगळे फोटोदेखील डिलिट केले आहेत. हे पाहून भाजप नेते अमित मालवीय यांनी नुसरत यांना काही प्रश्न विचारले आहेत.

अमित मालवीय यांनी ट्विट करत नुसरतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात नुसरत साडी नेसून एखाद्या नववधूप्रमाणे संसदेत उभी आहे. हा व्हिडीओ शेअर करत अमित यांनी लिहिलं, ‘कोणासोबत राहायचं आणि कोणासोबत लग्न करायचं हा टीएमसी संसद सदस्य नुसरत जहां यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु त्यांना जनतेने निवडून दिलं आहे. त्यांनी संसदेत निखिल जैनसोबत लग्न झाल्याची गोष्ट मान्य केली होती आणि त्या गोष्टीचा पुरावादेखील आहे. मला त्यांना विचारायचं आहे की, त्या वेळेस नुसरत संसदेत जे काही बोलल्या ते खोटं होतं का?’ असा प्रश्न विचारत अमित यांनी नुसरला धारेवर धरलं आहे.

नुसरतने तुर्कीमध्ये लग्न झाल्याने ते भारतात मान्य नसल्याचं सांगत निखिलसोबत असलेले सगळे संबंध तोडले. यासोबतच तिने निखिलवर तिचे पैसे आणि दागिने त्याच्याजवळ ठेवल्याचा आरोप केला आहे. भारतात लग्न अमान्य असल्याने घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत नुसरतने आम्ही लिव्ह- इन मध्ये राहत असल्याचं सांगितलं. नुसरतने १९ जून २०१९ रोजी निखिलसोबत लग्न केलं होतं. निखिलने मात्र त्याला लग्न मान्य असल्याचं म्हटलं आहे तर नुसरत यांनी हे लग्नच नसल्याचे म्हटले आहे .


शेअर करा