आणखी एक मॅग्नेट मॅन ‘ ह्या ‘ शहरात सापडला मात्र पोलखोल देखील झाली : पहा व्हिडीओ

  • by

सिडकोपाठोपाठ अंबड परिसरातील एका ६१ वर्षीय कंपनीमालक व निमाच्या कमिटी मेंबरने कोव्हिशील्ड लशीचा दुसरा डोस घेऊन दोन महिने झाले असतानाही त्यांच्या अंगाला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा केला असून, त्यांना बघण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. कालच अशाच स्वरूपाचा एक प्रकार नाशिकमध्येच पहायला मिळाला होता.

उपलब्ध माहितीनुसार, अंबडमधील महालक्ष्मीनगरमधील नानासाहेब देवरे (वय ६१) यांनी १० एप्रिलला कोव्हिशील्ड लशीचा दुसरा डोस घेतला. तब्बल दोन महिन्यांनंतर आता १० जूनला त्यांच्या शरीरावर लोखंडी वस्तू चिकटत असल्याचे दिसून आले. कामगारांच्या जेवणाचे डबे, चमचे व कॉइन लावून बघितले तर खरोखर हाताला, छातीला, पाठीला, कपाळाला व गालालाही या सर्व वस्तू चिकटल्याने सर्व जण आश्चर्यचकित झाले. त्यामुळे कामगारांमध्ये एकच चर्चा रंगली. त्यानंतर ते घरी आले. घरी हा प्रयोग कुटुंबासोबत केला, तर खरोखर सर्व वस्तू चिकटत होत्या. याबाबत परिसरात एकच चर्चा रंगली.

काय आहे प्रकरण ?

नाशिकच्या सिडको परिसरात शिवाजी चौकात राहणारे 71 वर्षीय अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या सोबत कालच हा प्रकार घडला असून याची नाशिकमध्ये जोरदार चर्चा आहे .नाशिकच्या सिडको भागातला हा प्रकार घडला असून अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या. असे सोनार यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी कोरोना लसीचा दुसरा डोस त्यांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला होता. त्यानंतर लस घेतल्यावर चुंबकत्व निर्माण होते असे समजल्यावर त्यांनी स्वतः प्रयत्न करून बघितला. तर त्यांना घरातील लोखंडाच्या आणि स्टीलच्या वस्तू, नाणे चमचे शरीरावर चिकटून राहात असल्याचे लक्षात आले. या संदर्भात तपासणी करूनच प्रतिक्रिया देऊ असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

“त्यांनी ज्या खासगी रुग्णालयात लस घेतली आहे, त्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. मात्र असा प्रकार घडल्याचा यापूर्वी कुठलाही विषय आलेला नाही” असे उमेश मराठे, लाईफ केअर हॉस्पीटल, संचालक यांनी सांगितले आहे तर अरविंद सोनार यांच्या म्हणण्यानुसार, ‘ मी लस घेतल्यानंतर हा प्रकार घडतो आहे. यापूर्वी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही वस्तू माझ्या अंगाला चिटकत नव्हत्या. हा नक्की काय प्रकार आहे ? याबद्दल मी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे ‘ असे सोनार यांनी म्हटले आहे .

“अरविंद सोनार यांनी सरकारी दवाखान्यात पहिली लस घेतली होती. ९० दिवसांनी अपोलो रुग्णालयात त्यांनी दुसरी लस घेतली. त्यानंतर त्यांच्या शरीरावर स्टील वगैरे वस्तू चिकटत आहेत. त्यांची तपासणी केल्यानंतर हे नेमकं कशामुळे होत आहे हे स्पष्ट होईल. आतापर्यंत साडे तीन लाखांहून जास्त लोकांना लस देण्यात आली असून इतर व्याधींमुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता कमी आहे,” असं पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

“अंगाला वस्तू चिकटत असतील तर तपासणी केली पाहिजे. आतापर्यंत अनेकांना लस देण्यात आली असून एखाद्याच्या अंगाला वस्तू चिकटत असतील तर त्याचा लसीशी काही संबंध नााही. शास्त्रीयदृष्ट्या हे शक्य नाही. त्यांच्या त्वचेशी संबंधित एखादी गोष्ट असू शकते जे तपासणीनंतर स्पष्ट होईल, पण याचा आणि लसीचा काही संबंधी नाही”, असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काय आहे म्हणणे ?

लस घेतल्यानंतर लोखंडी वस्तू चिकटण्याच्या कथित प्रकाराची पोलखोल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे. अंनिसचे कार्यकर्ते अण्णा कडलासकर यांनी नाशिकमधील या ‘चुंबकत्व दाव्या’चा फोलपणा सिद्ध केला आहे. त्यांनी केलेल्या खुलाशानुसार, खरे तर हा प्रयोग कोणीही माणूस करून पाहू शकतो. नाणे, उलथन जरासे ओले करून घ्या आणि पोट, दंड, पाठ अशा सपाट भागावर हलकेसे दाबून ठेवा. निर्वात पोकळी निर्माण होऊन जरावेळ अशी वस्तू चिकटून राहते. पाणी सुकले की ती हमखास पडते .

जगात असे चुंबकत्व कोणाच्याही अंगात येऊ शकत नाही! असा दावा अंनिसने केला आहे. सोबतच याचा व्हिडीओ देखील अंनिसकडून प्रसारित करण्यात आला आहे. अण्णा कडलास्कर यांनी देखील सोनार यांच्याप्रमाणेच लोखंडी वस्तू स्वत:च्या शरिराला चिकटवून दाखवण्याचा हा कथित चमत्कार करुन दाखवला आहे.याचा व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे .

याविषयी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर म्हणाले की, करोनाची लस आणि अंगाला नाणी आणि भांडी चिकटण्यामागे साधा पदार्थ विज्ञानाच्या नियम आहे. त्याचा करोना लसीकरणाशी संबंध जोडणे चुकीचे आहे. लसीकरण हे करोना विरोधी लढ्यातील महत्वाचे शस्त्र आहे. त्याविषयी सनसनाटी दावे करण्याआधी त्याची चिकित्सा होणे आवश्यक आहे.