प्रेयसीची दुसरीकडे सेटिंग लावून देतो काय ? अखेर ‘ तो ‘ तरुण आला गुंडाच्या हातात : महाराष्ट्रातील प्रकार

शेअर करा

एका तरुणाने आपल्या परिसरात राहणाऱ्या एका गुंडाच्या प्रेयसीची दुसऱ्या एका तरुणाशी फक्त ओळख करून दिली. त्यानंतर ती तरुणी नवीन तरुणाच्या जास्त संपर्कात राहू लागली आणि त्या गुंडाला भेटणे टाळू लागली, त्यामुळे त्या गुंडाला राग आला आणि त्याने ज्या तरुणाने आपल्या प्रेयसीची दुसरीकडे ओळख करून दिली त्याच्या हत्येचा कट रचला. त्यात ते यशस्वी होणारच होते मात्र रस्त्यावरच्या बीट मार्शलला ह्या प्रकारचा संशय आला नि त्या तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले. शेख इरफान शेख रहेमान (वय २७) असे ह्या तरुणाचे नाव असून त्याने गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे . बातमी नागपूरची असून बीट मार्शलच्या ह्या कामाचे परिसरात कौतुक होत आहे .

उपलब्ध माहितीनुसार, इरफान शांतीनगरच्या आरपीएफ क्वॉर्टरमागे पूर्वी राहत असून आरटीओ एजन्टचे काम करतो. रोज नवीन नवीन लोकांच्या संपर्कात येत असल्याने असाच तो एकदा आरोपी तसेच गुंड विजय हरिचंद्र चव्हाण याच्या प्रेयसीच्या संपर्कात आला. विजय हरिचंद्र चव्हाण हा कुख्यात गुंड असून काही दिवसापूर्वीच जामिनावर बाहेर आलेला आहे .

मार्चमध्ये इरफानने विजयच्या प्रेयसीची दुसऱ्या एका मित्रासोबत ओळख करून दिली होती त्यानंतर प्रेयसी विजयला टाळत दुसऱ्या तरुणांबरोबर फिरताना दिसायला लागली. इरफानमुळेच आपली प्रेयसी हातून गेली, याचा राग आरोपी विजयच्या मनात होता त्यामुळे विजयने याआधी देखील इरफानला एका ठिकाणी मारहाण केली होती मात्र त्याचवेळी इरफानने देखील आपले मित्र बोलावले आणि वाद तिथे तात्पुरता मिटला होता मात्र विजयने इरफानला त्यावेळी ‘ तेरा फायनल गेम करुंगा ‘ अशी धमकी दिली होती.

विजयपासून आपल्या जीवाला धोका असू शकतो ते इरफानच्या लक्षात आले आणि त्याने राहत असलेले घर बदलले आणि दुसरीकडे राहण्यास गेला. दरम्यान विजय त्याच्या मागावर होताच. इरफानला पकडण्याची संधी अखेर विजयच्या हातात आली. गुरुवारी रात्री ७ वाजता इरफान आणि त्याचा मित्र इम्रान खान हे दोघे सेवासदन चौकात होते. अचानक तिथे आरोपी विजय चव्हाण, शेख आरिफ ऊर्फ पहिलवान, शोबी शेख सतरंजीपुरा आणि हे चौघे दोन दुचाकीवर आले. त्यांनी इरफानला चाकू दाखवून मारहाण केली आणि अश्लील शिवीगाळ करत त्याला जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवले. त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याला निर्जन स्थळी नेऊ लागले.

आरोपींचे मनसुबे लक्षात आल्यामुळे सेंट्रल एव्हेन्यूवरून आरोपी त्याला घेऊन जात असताना इरफान जीव वाचवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडू लागला दरम्यान त्याचा आवाज स्त्यावरच्या बीट मार्शलने ऐकला आणि आरोपींचा पाठलाग सुरु केला.पाठलाग सुरु असल्याचे आरोपींच्या लक्षात येताच त्यांनी जोरात गाडी पळवली आणि अचानक करकचून ब्रेक दाबले त्याने पोलिसांची गाडी पुढे जाईल असा त्यांचा अंदाज होता मात्र ब्रेक मारल्याची संधी साधून इरफानने उडी मारली आणि सटकला. इरफान सटकला हे पाहताच आरोपी पळून गेले. इरफानने दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी आरोपी विजय चव्हाण आणि साथीदाराविरुद्ध अपहरण करून लुटमार करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे .


शेअर करा