नगर हादरले..आजोबांच्या मदतीने मुलाने केला वडिलांचा खून

  • by

घरगुती किरकोळ वादातून आजोबांच्या मदतीने मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात उघडकीस आली असून या घटनेनंतर जिल्हा हादरून गेला आहे. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे ही घटना घडली आहे. बाबुराव छबुराव निकम वय 51 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील बाबुराव छबुराव निकम ( वय 51 ) हे गुरुवारी सकाळी आपल्या मोटरसायकलसह सुरेगाव शिवारातील कोळगाव थडी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत संजय दामोदर निकम यांच्या उसाच्या शेती जवळील एका नाल्यात मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती पोलीस पाटील संजय वाबळे यांना कळविण्यात आली. वाबळे यांनी संबंधित माहिती कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना दिली जाधव यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करत अधिक माहिती घेतली.

बुधवारी रात्री नऊ ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान बाबुराव निकम यांच्या डोक्यात व शरीरात धारदार लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना निदर्शनास आली. वृद्ध बाबुराव निकम यांच्या पत्नी लताबाई बाबुराव निकम यांच्याकडे चौकशी केली असता सवत झुंबरबाई बाबुराव निकम यांचा मुलगा सोनू उर्फ प्रफुल्ल बापूराव निकम व त्याचे झुंबरबाईचे वडील सोपान लक्ष्‍मण कोपरे यांनी नेहमीच्या घरगुती वादाच्या रागातून पती बाबुराव निकम यांचा खून केल्याचे लताबाई निकम यांनी सांगितले.

पोलिसांनी लताबाई यांच्या तक्रारीवरून गुरुवारी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये सोनू उर्फ प्रफुल्ल बाबुराव निकम व सोपान लक्ष्‍मण कोपरे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव अधिक तपास करत आहेत.