“डॉ. आंबेडकरांचा वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकरची पात्रता नाही”, काँग्रेस नेत्याचा जोरदार एकेरी हल्ला

  • by

नवी मुंबई विमानतळाचा वाद थांबता थांबत नसल्याचं दिसत आहे. आता पनवेलचे काँग्रेस नेते अभिजीत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केलीय. “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकर या माणसाची काही एक पात्रता नाही. अजिबात स्वकर्तृत्व नसलेला हा तथाकथित नेता आयुष्यभर कुणाच्यातरी कुबड्यांवर राजकारणात उभा राहिला,” असा आरोप अभिजीत पाटील यांनी केलाय. आंबेडकरांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी केल्यानंतर ही टीका करण्यात आलीय.

पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अभिजीत पाटील फेसबुक पोस्ट मध्ये म्हणतात, “दि. बा. पाटील आणि नवी मुंबई विमानतळ याच्याशी प्रकाश आंबेडकर यांचा काही एक संबंध नाही. नवी मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला काडीचे स्थान नाही. नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्यांची हौस ही दुसरी घाण सवय आहे.”

पाटील पुढे म्हणतात, “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकर या माणसाची काहीएक पात्रता नाही. अजिबात स्वकर्तृत्व नसलेला हा तथाकथित नेता आयुष्यभर कुणाच्यातरी कुबड्यांबर राजकारणात उभा राहिला आणि नंतर खाल्ल्या पानात थुंकून दुसऱ्याच्या वळचणीला गेला. राजकारणातला त्यांचा वावर हा सुपारी घेतल्यासारखाच आहे ही एक बाब आहे. आपला काही संबंध नाही अशा गोष्टीत नाक खुपसून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्यांची हौस ही दुसरी घाण सवय त्यांना आहे,”

अभिजीत पाटील म्हणाले, “नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं की दि. बा. पाटील यांचं, याच्याशी वास्तविक प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा सुतराम संबंध नाही. नवी मुंबईत त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला काडीचं स्थान नाही. इथल्या लोकभावना, इथल्या अस्मिता, इथले आर्थिक प्रश्न, याबाबत प्रकाश आंबेडकरांना चार परिच्छेदांचा निबंध कुणाशी चर्चा न करता लिहून दाखवला तर मी त्यांचा दास होईन. दि. बा. पाटील यांच्याबद्दलही त्यांना काही माहिती असेल अथवा आस्था असेल अशातलाही भाग नाही. पण खूप दिवसांत पेपरात नाव आलं नाही आणि महाविकास आघाडी सरकारला विरोध करणं हा सध्या एकमेव व्यवसाय असल्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे नावाला विरोध करत ‘संघ’प्रणित भाजपच्या हातात हात मिळवलाय.”

“2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करून आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडून भाजपला अशीच अप्रत्यक्ष मदत केली होती. 4 वर्षांपूर्वी तमाम विरोधी पक्षांनी मुंबईत “संविधान बचाव” मोर्चा काढला तेव्हा हे घटनाकारांचे वारस कसला तरी फडतुस प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करुन त्यापासून दूर राहिले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानापेक्षा आपले वैयक्तिक रागलोभ प्रकाश आंबेडकरांना जास्त महत्त्वाचे वाटले होते,” असाही घणाघाती पाटील यांनी केला आहे.

अभिजीत पाटील म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आणि दि. बा. पाटील आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. नव्या मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दिबांनी आपली हयात घालवली. राजकीय पदांची कधी पर्वा केली नाही. प्रकाश आंबेडकरांनी दिबांच्या संघर्षात कधी वाटा उचलल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. तिथे झपाट्याने कॉस्मॉपॉलिटन होत असलेल्या मुंबईत बाळासाहेबांनी मराठी अस्मिता धगधगत ठेवली. गरीब घरात जन्मलेले, गल्लीबोळात वाढलेले असंख्य बहुजन तरुण त्यांनी राजकारनात आणले आणि एक अख्खी पिढी घडवली. शाहू, फुले, आंबेडकरांनंतर एक आगळं सोशल इंजिनिअरिंग कुणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरे यांनी. या दोघांचीही महती इतकी मोठी आहे की विमनतळाला नाव दिल्याने किंवा न दिल्याने, ती वाढणार नाही की कमी होणार नाही. या दोघांच्या नखाचीही सर प्रकाश आंबेडकरांना नाही.”

“विमानतळाला कुणाचं नाव द्यायचं यावरुन मतभेद निर्माण झालेले दिसले, तिथे तापल्या तव्यावर आपली पोळी भाजायला हे पुढे आलेत. दोन्ही बाजूच्या लोकांनी शांततामय मार्गाने यावर तोडगा काढावा अशी अपेक्षा आहे. पण आगीत तेल ओतायला आलेल्या प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना मात्र थारा देऊ नये. नवी मुंबईत प्रकल्पग्रस्त आणि बाहेरून आलेले लोक यांच्यात आता कुठे सुसंवाद प्रस्थापित होतोय. विघ्नसंतोषी लोकांमुळे तो बिघडता कामा नये. ‘नावात काय आहे?’, असं शेक्सपिअर म्हणून गेला. पण हे बाळासाहेब आणि ते बाळासाहेब यात अमाप फरक आहे. ते बाळासाहेब झकास पाईप ओढायचे. सुपारी खायचे नाहीत,” असंही ते म्हणाले.