मोदींनी मन की बात मधून कौतुक केलेल्या शेतकऱ्याची भाजपकडे पाठ, ‘ ह्या ‘ पक्षात केला प्रवेश

शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेल्या शेतकऱ्याने देखील मोदींच्या कौतुकाकडे पाठ फिरवली आहे . मोदी यांनी अकोल्याचे शेतकरी मुरलीधर राऊत यांचं मन की बात कार्यक्रमातून तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून काँग्रेस बळकट करण्यासाठी यापुढची प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे .

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते अकोल्यात आले होते. त्यावेळी मुरलीधर राऊत यांच्या हॉटेल मराठामध्ये प्रवेश सोहळा पार पडला. बाळापूर तालुक्यातील पारस फाट्यावर हॉटेल मराठा नावाने त्यांचं हॉटेल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 नोव्हेंर 2016 मध्ये मन की बात या कार्यक्रमात राऊत यांचं कौतुक केलं होतं. नोटबंदीच्या काळात राऊत यांनी पैसे नसणाऱ्या अनेक लोकांना मदत केली होती. महामार्गावरून ये जा करणाऱ्यांना त्यांनी आपल्या हॉटेलमधून मोफत जेवण दिलं होतं. त्यांच्या या कामाची पंतप्रधान मोदींनी दखल घेत त्यांचे कौतुकही केले होते.

मुरलीधर राऊत यांच्याकडे आधी शेती होती पण राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात जागा गेली होती. त्यातून त्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी जमीन गेलेल्या इतर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेत मुद्दा उचलून धरला होता. निव्वळ कौतुक केल्याने लोकांची पोटे भरत नाही याची जाणीव मोदींना नसल्याने आणि अखेर न्याय मिळत नसल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे . काँग्रेसमध्ये राहून अधिक प्रभावीपणे लोकांच्या प्रश्नासाठी लढता येईल, असेही ते म्हणाले.

मुरलीधर राऊत यांनी आधी ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा लढवला होती. शेळद गावचे ते सरपंच राहिले होते. त्यांनी आपल्या गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे त्यांनी मोफत लग्न लावून देण्याचा उपक्रम सुद्धा राबवला होता. मागील वर्षी कोरोनाच्या काळात सुद्धा मुरलीधर राऊत यांनी आपल्या हॉटेलमध्ये अनेक मुलींची लग्न मोफत लावून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.


शेअर करा