
राज्यातील कोरोनाच्या नव्या निकषांनुसार अहमदनगर जिल्हा करोना संसर्गाच्या दृष्टीने पहिल्या स्तरात आहे. त्यामुळे बहुतांश निर्बंध उठविण्यात आले आहेत. विवाह समारंभावरील देखील असलेले निर्बंधही शिथील करण्यात आले असून शंभर जणांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याचे काही दुष्परिणामही आता समोर येऊ लागले आहेत. अशीच एक घटना नगर जिल्ह्यात राहुरी इथे घडली आहे
राहुरी तालुक्यातील कणगर येथील एका विवाह सभारंभात वधू-वरांसह तब्बल २५ जणांना करोनाची बाधा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे नवविवाहितांना थेट कोविड केअर सेंटरमध्येच दाखल होण्याची वेळ आली. नवरदेव व नवरी हे याच गावातील आहेत. दोन्हीकडील वऱ्हाडी मंडळी वस्तीवरीलच होते. लग्नानंतर हळद फेडण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नवरदेवाला त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.
खाजगी रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यावर करोनाची चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे लगेच देवळाली प्रवरा येथील सहारा कोविड सेंटरमध्ये नवरदेवाची करोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तो करोना बाधित असल्याचे आढळून आले. नवरीलाही त्रास होत असल्याचे आढळून आल्यावर तिचीही चाचणी करण्यात आली. तिला संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्या दोघांनाही कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
सरपंच सर्जेराव घाडगे यांनी करोनामुक्त गाव मोहीम लक्षात घेऊन यासाठी पुढाकार घेतला. प्रशासनाच्या मदतीने दोन्ही ठिकाणच्या वऱ्हाडी मंडळींच्या वस्त्यांवर रॅपीड अँटीजेन टेस्टचे शिबीर घेतले. लग्न समारंभाला हजेरी लावलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली त्यात तब्बल २५ जणांना बाधा झाल्याचे आढळून आले. सुदैवाने सर्वांना सौम्य लक्षणे आढळून आली असल्याने सर्वांना राहुरी कृषी विद्यापीठाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.