
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नारायणगाव येथील माजी सरपंच राजाराम शेळके यांच्या हत्येचे गूढ उकलले असून मयत प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम यानेच वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तलवारीने वार करून राजाराम शेळके यांचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. संग्राम सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याने खुनाची कबुली दिली आहे तसेच घटनाक्रम देखील सांगितला आहे.
राजकीय वर्चस्व व आपसातील वादातून मयत राजाराम शेळके याने दहा वर्षापूर्वी नारायण गव्हाणचे तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांची सुपारी देऊन हत्या केली होती. या गुन्ह्यात राजाराम याच्यासह त्याचा मुलगा राहुल व इतर तीन जण अशांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. प्रकाश कांडेकर यांची हत्या झाली तेव्हा त्यांचा मुलगा संग्राम लहान होता. कोरोना संसर्गामुळे राजाराम शेळके याला संचित रजा मिळाल्याने तो नारायण गव्हाण येथील त्याच्या शेतांमध्ये वास्तव्यास आला होता. राजाराम शेळके याने वडिलांचा खून केल्याची सल लहानपणापासून संग्राम याच्या डोक्यात होती आणि त्याने वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचे ठरवले होते.
राजाराम तुरुंगातून आल्यानंतर त्याचा काटा काढण्याची संग्रामने योजना केली होती. त्यासाठी एक धारदार तलवार उपलब्ध करून ठेवली होती. घटना घडण्यापूर्वी तीन ते चार दिवस संग्राम राजाराम याच्या मागावर होता. 11 जून रोजी राजाराम हा शेतात काम करत होता त्यावेळी संग्राम कांडेकर हा शेता शेजारील उसाच्या मध्ये लपून बसला होता.
दुपारी एक वाजताच्या सुमारास राजाराम शेतामधील शेततळ्याचे काम करणाऱ्या मजुरांना सूचना देऊन एकटाच परतत असताना संग्रामने पाठीमागून त्याच्यावर हल्ला केला आणि राजाराम याच्यावर तलवारीचा जोरदार वार केला. एकाच वारामध्ये राजाराम जमिनीवर कोसळला त्यानंतर संग्रामने पुन्हा त्याच्या मानेवर आणखी दोन वार केले असा घटनेचा घटनाक्रम संग्राम याने पोलिसांना सांगितला आहे.
सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन गोकावे यांनी संग्राम कांडेकर याला अटक केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली असून त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. हत्या करणाऱ्याचे नाव समोर आले आहे मात्र या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
काय आहे प्रकरण ?
पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण येथील माजी सरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आणि सध्या पॅरोल रजेवर असणारा माजी सरपंच राजाराम जयवंत शेळके याची शुक्रवारी नारायण गव्हाण येथील शेतात गळा चिरून हत्या करण्यात आली होती.राजाराम शेळके हा शुक्रवारी दुपारी त्याच्या नारायण गव्हाण येथील शेतात काम करत होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला गेला. हल्ला केल्यानंतर मारेकर्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार केले. त्याच्या मानेला गंभीर जखम झाली. त्याला तातडीने शिरूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले .
दहा वर्षांपूर्वी 13 नोव्हेंबर 2010 रोजी नारायणगव्हाण सेवा संस्थान अध्यक्ष प्रकाश कांडेकर यांची नगर-पुणे महामार्गाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती ही हत्या तत्कालीन सरपंच राजाराम शेळके यांनी सुपारी देऊन केली होती. पोलीस तपासात हे सिद्ध झाले आणि राजाराम शेळके याला शिक्षा झाली होती मात्र सध्या तो पॅरोल रजेवर गावी आला होता. त्याच दरम्यान त्याची देखील हत्या करण्यात आली.
13 नोव्हेंबर 2010 रोजी नगर पुणे रोड वरून नारायण गव्हाण शिवारातून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी डोक्यात गोळ्या झाडून प्रकाश कांडेकर यांची हत्या केली होती. राजाराम शेळके याने सुपारी देऊन हे हत्याकांड घडून आल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. दरम्यान गोळी लागल्यानंतर कांडेकर यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता त्यांच्या डोक्यातील गोळी रात्रीतून गायब करण्यात आली. त्यावेळी देखील हे प्रकरण चांगलेच गाजले होते . गोळी गायब करून आरोपींना मदत केल्यावरून सिव्हिल हॉस्पिटलचे तत्कालीन दोन डॉक्टर यांच्यासह एका कर्मचाऱ्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजाराम शेळके यांच्या यांच्या हत्येमुळे प्रकाश कांडेकर हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या हत्येच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने राजाराम शेळके यांच्यासह त्याचा मुलगा राहुल व इतर तिघे अशा पाच जणांना 2017 मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आली आहे. वडिलांच्या खुनाचा बदल घेण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे आढळून आले आहे .