मृत्यूला कोरोना लस कारणीभूत; भारतात झाली पहिली नोंद

शेअर करा

कोरोना लस घेतल्यानंतर देशात पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना लसीमुळे एका 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालामधून ही बाब समोर आली आहे. लस दिल्यानंतर एखादा गंभीर आजार झाल्यास किंवा त्या व्यक्तीचा थेट मृत्यू झाल्यास त्याला वैज्ञानिक भाषेत अ‍ॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्यूनिझेशन अर्थात AEFI म्हणतात. अशा प्रकरणांची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारने AEFI साठी समिती स्थापन केली आहे. AEFI समितीचे चेअरमन डॉ. एन के अरोरा यांनी या पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मात्र जास्त काही बोलण्यास त्यांनी नकार दिला असल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

सदर समितीने लसीकरणानंतर 31 मृत्यूंची माहिती घेतल्यानंतर अ‍ॅनाफिलेक्सिसमुळे 68 वर्षीय वयस्कर नागरिकाचा मृत्यू झाल्याचं मान्य केलं आहे. असं होणं ही एक प्रकारची अ‍ॅलर्जीच आहे. या व्यक्तीला लसीचा पहिला डोस 8 मार्च 2021 रोजी दिला गेला होता. त्यानंतरच्या काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला आहे. लसीकरणानंतर प्रकृतीवर प्रतिकूल परिणामाच्या 26 हजार 200 केसेसची नोंद देशात झाली. यातील केवळ 488 रुग्णांचा मृत्यू झाला. 23 कोटी 50 लाख डोस घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ 0.01 टक्के इतकी अत्यल्प आहे. यावरून लस घेणे सुरक्षितच असल्याचा मुद्दा अधोरेखित झाला.

लस घेतल्यानंतर प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम झाल्यास संबंधित रुग्ण एईएफआयची केस ठरतो. वैद्यकीय परिभाषेत त्यास अॅडव्हर्स इव्हेंट्स आफ्टर इम्युनायझेशन (एइएफआय) असे संबोधले जाते.

1) सामान्य किंवा किरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णांना ताप, अंगदुखीच्या वेदना आणि इंजेक्शन दिलेल्या जागी सूज, चिडचिड असा त्रास होतो.

2) पुढील प्रकार तीव्र असतो ज्यात रुग्णांना अंगदुखी आणि सूज असा त्रास होतो. इंजेक्शन दिलेल्या भागाजवळील स्नायूबंधाला वेदना होतात. तापाची तीव्रता जास्त असते.

3) गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते किंवा त्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना शारीरिक दुबळेपणा येतो.

लसीमुळे आणखी तीन मृत्यू लशीमुळे झाल्याचे म्हटलं जातंय. मात्र, अद्याप त्याची पुष्टी होणे बाकी आहे. डॉ. एन के अरोरा यांनी म्हटलंय की, हजार जणांमध्ये एकाला ही अ‍ॅलर्जी होऊ शकते. लसीकरणानंतर अ‍ॅनाफिलेक्सिसची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार आवश्यक आहेत. 30 हजार ते 50 हजारांपैकी एकाला अ‍ॅनाफिलेक्सिस किंवा तीव्र अ‍ॅलर्जीची लक्षणे दिसतात, हे लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचार घेणं आवश्यक आहे.


शेअर करा