पतीला तोंडानं ऑक्सिजन देणाऱ्या ‘ त्या ‘ महिलेचं पुढे काय झालं ?

  • by

 9 total views

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं टोक गाठलं असताना देशात अभूतपूर्व असा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मिळावा यासाठी त्यांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी उत्तर प्रदेशातील एका महिलेचा फोटो व्हायरल झाला होता. पतीचा जीव वाचवण्यासाठी एक महिला त्याला तोंडानं श्वास देत होती. चार रुग्णालयांनी बेड नसल्याचं सांगून पतीला दाखल करुन घेण्यासा नकार दिला. पतीचा श्वास सुरू राहावा यासाठी महिलेनं शेवटपर्यंत प्रयत्न केले मात्र त्यात तिला यश आले नाही आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला. एका रिक्षात बसून अत्यवस्थ पतीला तोंडानं श्वास देणारी पत्नी पाहून संपूर्ण देश हळहळला.

सोशल मीडियावर गेल्या महिन्यात व्हायरल झालेल्या महिलेच्या दुर्दैवाचे दशावतार अद्यापही संपलेले नाहीत. सरकारकडून मदत तर सोडाच अद्याप त्या महिलेची दखलही घेण्यात आलेली नाही. उत्तर प्रदेशातल्या आग्र्यात राहणाऱ्या त्या महिलेचं नाव रेणू सिंघल आहे. गेल्याच महिन्यात पती रवी सिंघल यांचं निधन झाल्यानं कुटुंबाची जबाबदारी आता रेणूंवर आहे. त्या आग्र्यात मुलीसह आवास विकास कॉलनीत एका लहानशा घरात वास्तव्यास आहेत. त्यांना महिन्याला अडीच हजार रुपये भाडं भरावं लागतं.

रेणू काय म्हणतात ?

माझी मुलगी भूमी १६ वर्षांची आहे. ती आता दहावीला आहे. माझे पती घरातले एकमेव कमावते होते. आमच्याकडे रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड नाही. सध्या लॉकडाऊन असल्यानं नोकरीही मिळत नाही. त्यामुळे परिस्थिती अतिशय बिकट आहे. राहत्या भागात पेठे विकून पती कुटुंबाचं पोट भरायचे मात्र लॉकडाऊनमध्ये उत्पन्न बंद झालं. थोड्याच दिवसात बचत केलेले पैसेदेखील संपले. मुलीचं पोट भरण्यासाठी मी नोकरी शोधत आहे पण नोकरीच मिळत नाही. हाताला काम नसल्यानं परिस्थिती अतिशय वाईट आहे. मला माझ्या मुलीची चिंता वाटते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आम्हाला मदत करावी.