‘ त्या ‘ चुंबक माणसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कोणी केली ?

शेअर करा

काही दिवसांपूर्वी कोरोना लस घेतल्यानंतर अंगार चुंबकत्व येते, असा दावा अनेक व्यक्तींनी केला. कोरोनाच्या काळात अशी बातमी आल्याने तिची साहजिकच मोठी चर्चा झाली मात्र लसीमुळे शरीरात चुंबकत्व येते, याला शास्त्रीय आधार नाही. असल्या अफवेमुळे गैरसमज निर्माण होऊन लसीकरणाला खीळ बसेल. त्यामुळे फसवे दावे करणाऱ्यांवर शासनाने साथ प्रतिबंध व जादुटोणाविरोधी कायदयान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी अंनिसने केली आहे.

चुुंबक मॅनच्या दाव्याविषयी अंनिसतर्फे प्रा. प. रा. आर्डे यांनी ऑनलाईन व्याख्यानामधून विवेचन केले. ते म्हणाले, चुंबकत्त्वाच्या जगभरातील दाव्यांची चिकित्सा झाली आहे. माणसात चुंबकीय शक्ती तयार होत नसून अन्य कारणांनी धातूच्या वस्तू चिकटत असल्याचे सिद्ध झाले आहे. सर्बियामधील मुलाने छातीवर धातूंच्या वस्तू तोलून दाखवल्या. चुंबकीय शक्तिचा दावा केला. संशोधकांनी तपासाअंती त्याच्यात चुंबकत्व नसल्याचे सिद्ध केले. या मुलाला काच, लाकूडही चिकटत होते. त्यामुळेही त्याच्यात चुंबकीय शक्ती नसल्याचे सिद्ध झाले. मलेशियातील ल्यू थो लिन ही व्यक्ती अंगावर अनेक किलोंच्या धातूच्या वस्तू तोलून धरायचा. पोटाजवळ लोखंडी पट्टी अडकवून व तिला साखळी बांधून मोटार ओढायचा. त्याच्यातही चुंबकशक्ती नसल्याचे तपासानंतर सिद्ध झाले.

प्रा. आर्डे म्हणाले, घामातील सिबम द्रव्याच्या बलामुळे एक प्रकारचा चिकटपणा होतो. त्यातून निर्माण झालेले घर्षण गुरुत्वाकर्षणाला संतुलित करते. त्यामुळे वस्तू तोलल्या जातात. चुंबकीय शक्तिचा दावा करणाऱ्याच्या अंगावर सुगंधी पावडर टाकली असता वस्तू चिकटत नाहीत, हेदेखील सिद्ध झाले आहे.

शरीर केसविरहीत व गुळगुळीत असणारी आणि त्वचा रबरासारखी असणारी कोणतीही व्यक्ती धातूच्या वस्तू अंगावर तोलून धरू शकते.राहुल थोरात, त्रिशला शहा, आशा धनाले, संजय गलगले, सुहास यरोडकर, डॉ. सविता अक्कोळे, डॉ. संजय निटवे, गीता ठकार, शशिकांत सुतार, चंद्रकांत वंजाळे, सुहास पवार, अमोल पाटील, धनश्री साळुंखे आदींनी व्याख्यानाचे नियोजन केले.


शेअर करा