मोठी बातमी..आजपासून राज्यात ‘ ह्या ‘ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण : राजेश टोपे

  • by

 6 total views

संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा बसला होता. महाराष्ट्रातही कोरोनाबाधित आणि मृत्यूंची संख्या वाढलेली पाहायला मिळाली. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर ओसरताना दिसत असून, लसीकरण मोहिमेवर पुन्हा अधिकाधिक भर दिला जात आहे. यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना दिलासा देणारी माहिती दिली असून, त्यानुसार आज शनिवार १९ जूनपासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले जात आहे.

राज्यात शनिवार, १९ जूनपासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. याशिवाय ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला आहे. या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ऍप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार असून, विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

राज्यात करोनाचे मृत्यू लपवले हे आरोप मी कधीही सहन करणार नाही, ते अत्यंत खोटे आरोप आहेत, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट करत केले जाणारे आरोप फेटाळून लावले आहेत. महाविकास आघाडीने मृत्यू लपवलेले नाहीत. देशात महाराष्ट्र अॅक्टिव्ह केसेस आणि मृत्यूसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर होता. ते आम्ही कधीही लपवले नाही. खासगी रुग्णालयांनी मृतांचे आकडे वेळेवर दिले पाहिजेत. बऱ्याचदा खासगी रुग्णालयांकडून १५ दिवस आकडे उशिरा दिले जातात, हे याचे कारण असू शकते, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.