‘ वटकन ‘ वरून भर लग्नात पेटला वाद आणि त्यानंतर…

शेअर करा

लग्नसमारंभ आटोपल्यानंतर नववधू व वर यांना जेऊ घातले जाते यावेळी नवरदेवाच्या ताटाला वधूपक्षाकडून वटकन लावण्याची प्रथा समाजात रूढ आहे. म्हणजेच काही रक्कम किंवा दागिना यासाठी दिला जातो मात्र हौसेने करावयाची ही प्रथा विवाहबद्ध झालेल्या वधू-वरांची रेशीमगाठ तोडण्यास कारणीभूत झाल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे रविवारी 20 तारखेला घडला आहे.

सिद्धटेक येथील मुलगा रविवारी नांदगाव येथील मुलीशी विवाहबद्ध झाला. लग्न समारंभ उत्साहात साजरा झाला. पुढे कन्या पाठवण्याच्या आधी वधू-वरांना जीव घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला. प्रथेप्रमाणे वधूपक्षाकडून दोनशे रुपये वटकन म्हणून ताटाला लावण्यात आले इथेच वाद पेटला. लावलेल्या दोनशे रुपयांवर वर पक्षाकडील लोकांचे समाधान झाले नाही. त्यांच्याकडून वाढीव पैशाची मागणी होऊ लागली. वधु पक्षांनी त्यास नकार दिला. रुसवे-फुगवे देखील टोकाला गेले आणि मग वधूपित्याने मुलीची पाठवणी न करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान ग्रामस्थांनी त्यांना बराच काळ समजावण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर त्यांनी नकार दिला आणि वर पक्षाने देखील पोलिस स्टेशन गाठले. पोलीस स्टेशन पर्यंत हा वाद पोहोचल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे विवाहस्थळी पोहोचले आणि त्यांनी सर्व प्रकार समजून घेतला. वधूपित्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम होते. नववधू देखील सज्ञान असल्याने पोलीस अधिकारी माने यांनी नववधूला तिचा निर्णय विचारला मात्र तिने देखील सासरला न जाण्याचा निर्णय घेतला अखेर वर पक्षाकडील मंडळींना वधू तिथेच ठेवून घरी परतावे लागले


शेअर करा