‘ माझ्या घरावर धाड टाकत … ‘ शंकरराव गडाख यांचेही भाजपवर गंभीर आरोप

शेअर करा

“माझ्या घरावर पण धाड टाकून झडती घेतली व मला त्रास दिला गेला”, असा गंभीर आरोप महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री शंकरराव गडाख यांनी केला आहे. तत्कालीन शिवसेना भाजप युती सरकार असताना हा त्रास दिला गेला असे शंकरराव गडाख यांनी म्हटले आहे. मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी उस्मानाबाद येथे त्यांना गेल्या सरकारच्या काळात सत्तेचा वापर करून दिल्या गेलेल्या त्रासाबद्दल आपले मन मोकळे केले.

शंकरराव गडाख म्हणाले , ‘ मागच्या 5 वर्षांच्या काळात जेव्हा मी आमदार नव्हतो तेव्हा माझ्या घरावर शेतकरी आंदोलनाची नोटीस प्रकरणात सत्तेचा दुरूपयोग करीत धाड टाकली गेली. शेतकरी आंदोलन प्रकरणात दाखल गुन्ह्यात कोर्टाची नोटीस माझ्यापर्यंत आलीच नाही. कोर्टात शेवटची तारीख असल्याने मी यापूर्वी नोटीस न मिळाल्याने हजर झालो नाही, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या 20 ते 25 जणांच्या पोलीस पथकाने माझ्या घरावर धाड टाकली व झडती घेतली आणि मला त्रास दिला. सत्ता मिळवणे व राखणे करीता होणारे हे असे प्रकार दुर्दैवी असुन ते थांबले पाहिजेत ‘

शंकरराव गडाख म्हणाले, ‘ शिवसेनेची सत्ता असताना गृह खाते कोणाकडे होते ? खरी सत्ता कोण चालवत होते? या खोलात मी जाणार नाही. मात्र, मला त्रास दिला गेला ते चुकीचे होते. कोण हे प्रकार करत आहे. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही . आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री यांना जे पत्र लिहले त्यात त्यांनी भावना व्यक्त केल्या,राजकारण करत असताना कुटुंबावर अनेक कटू प्रसंग येतात. राजकीय द्वेषातून अलीकडच्या काळात कुटुंबाला त्रास देण्याचा प्रकार सुरू झाले आहेत ते महाराष्ट्रला नवीन आहे. महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष सुरक्षित आहे. काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षाच्या प्रमुखांनी किमान समान कार्यक्रमवर आधारीत सरकार स्थापन केले आहे. राजकारणात ज्यांना त्रास झाला, ते त्रासाबद्दल त्यांना आलेले अनुभव ते सांगत आहेत ‘

शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आले होते त्यानंतर ते शिवसेनेत दाखल झाले आणि त्यांना जलसंधारण मंत्री करण्यात आले. त्यामुळे त्यावेळी आपण आता ज्या शिवसेना पक्षात आहात तोच पक्ष सत्तेत सहभागी असताना आपणास त्रास दिला गेला, असं विचारल्यावर त्यांनी बोलण्याचा रोख हा भाजपाकडे वळवीत भाजपचे नाव न घेता भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

शंकरराव गडाख यांनी उस्मानाबाद येथे शासकीय विश्रामगृह येथे त्यांना दिल्या गेलेल्या त्रासाचा अनुभव कथन केला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे उपस्थित होते. सरनाईक यांनी भाजप सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप केला होता. त्याच अनुषंगाने मंत्री गडाख यांनी सुद्धा भाजपच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला असल्याने सत्तेचा कसा दुरुपयोग केला जातो हे देखील स्पष्ट झाले आहे .


शेअर करा