मोठी बातमी..निपाह व्हायरस महाराष्ट्रात दाखल , जाणून घ्या लागण कशी होते आणि लक्षणे काय ?

  • by

 5 total views

महाराष्ट्रात कोरोना विषाणूनं थैमान घातलं असतानाच राज्याच्या चिंतेत भर घालणारी बातमी समोर येत आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील गुहेतील दोन वटवाघुळांमध्ये निपाह विषाणू सापडला आहे. राज्यात निपाह विषाणू आढळण्याची ही पहिलीच घटना आहे. मोठ्या प्रमाणात मृत्युदर असलेल्या निपाह विषाणूने बाधित अशी दोन वटवाघळे आढळून आल्याने राज्यात चिंता वाढली आहे .

सर्वप्रथम एनआयव्ही १९९८ मध्ये मलेशियातील वराहपालकांमध्ये आढळला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात निपाहचा प्रसार झाला. वाटवाघळे ही या विषाणूची नैसर्गिक वाहक आहेत. बाधित वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळं खाल्ल्यानं निपाहचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसंच निपाहचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास संसर्ग होऊ शकतो. एनआयव्ही (निपाह ) चा संसर्ग झालेली वटवाघळे आणि डुकरांच्या थेट संपर्कातूनही हा संसर्ग होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

मानवाला विषाणूंचा संसर्ग प्रामुख्याने डोळे, नाक, तोंडाद्वारे होण्याची शक्यता असते. प्रादुर्भाव झाल्यावर ‘ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, प्रकाशाची भीती वाटणे, अशी या आजाराची लक्षणे आहेत. यासारख्या लक्षणांवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सना विषाणूची माहिती नसल्यास त्यांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

निपाह विषाणूमुळं होणाऱ्या संसर्गावर कोणतेही ठोस उपचार नाहीत. या आजारावर अद्याप औषधे व लस उपलब्ध नसल्यानं संसर्गामुळं होणारा मृत्यूदरही अधिक आहे. ‘निपाह’ विषाणूचा ‘स्वाइन फ्लू’सारखा वेगाने संसर्ग होत नाही किंवा त्याचा प्रसार होत नाही मात्र ‘स्वाइन फ्लू’च्या तुलनेत ‘निपाह’ विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच रुग्णाला अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येतात. या विषाणूमुळे होणाऱ्या आजार टाळण्यासाठी कोणतीही लस नाही. संसर्ग झाल्यावर इन्क्युबेशन कालावधी ५ ते १४ दिवस असतो.

भारतात यापूर्वी २००१ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात सिलिगुडी (पश्चिम बंगाल) येथे निपाहचे ६६ रूग्ण आढळले होते. त्यापैकी ४५ रूग्णांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. २००७ मध्ये एप्रिल महिन्यात पश्निम बंगालमधील नादिया येथे निपाहचे पाच रुग्ण आढळले होते. त्या पाचही रुग्णांचा मृत्यू झाला होता. एका वटवाघळाकडून दुसऱ्या वटवाघळाला मात्र संसर्ग होत नाही. एका वटवाघळाला विषाणूची लागण झाल्याने दुसऱ्या वटवाघळांमध्ये ‘अॅन्टीबॉडीज’ तयार होतात. त्यामुळे त्यांना संसर्ग होत नसल्याने सर्वच वटवाघळांमध्ये विषाणू आहे असे नाही तर मोजक्याच वटवाघळांमध्ये विषाणूचा संसर्ग होतो.