संतापजनक..बेशुद्ध पडलेल्या रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडले, मुंबईतील प्रकार

शेअर करा

उत्तर प्रदेश आणि बिहार येथील आरोग्य व्यवस्थेवर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात मात्र त्याहून गंभीर प्रकार महाराष्ट्रात उघडकीस आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात एका रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. श्रीनिवास यल्लपा असे या 24 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. श्वास घेताना दम लागत असल्यामुळे या तरुणाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा तरुण अतिदक्षता विभागात बेशुद्धावस्थेत असताना हा प्रकार घडला.

उपलब्ध माहितीनुसार, श्रीनिवास यलप्पा या तरुणाला श्वास घेताना दम लागत होता. नंतर त्रास असह्य झाल्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या तरुणाला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले. या बाबतचे उपचार घेत असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांना या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. नंतर नातेवाईकांनी तपासले असता तरुणाच्या डोळ्यांना उंदराने कुरतडले असल्याचे समजले.

हा प्रकार समजल्यानतर तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील नर्सना विचारले असता नर्सने त्यांना उद्धटपणे उत्तरे दिली. तसा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. नंतर हा प्रकार सार्वजनिक झाल्यानंतर राजावाडी येथील मनपा रुग्णालय प्रशासनावर सर्वत्र टीका झाली. तसेच परिसरात मोठी खळबळ माजली. या प्रकारामुळे रुग्णालयात ज्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तेसुद्धा काही काळ घाबरून गेले होते.

ज्या आयसीयू रूममध्ये ही घटना घडली त्या तळमजल्यावर उंदरांचा वावर आहे. श्रीनिवास यांना उंदराने चावा घेतला असल्याचे दिसते आहे. याबाबत सुरक्षेचे उपाय करीत आहोत, असे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी सांगितले असून डोळा राहणार की काढावा लागणार यावर माहिती अद्याप समोर आलेली नाही.


शेअर करा