.. म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदींची केली ‘ पंचआरती ‘ , नगरमध्ये जोरदार चर्चा

शेअर करा

ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात येण्यास केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारच जबाबदार आहे, असा आरोप करून काँग्रेसने मोदी सरकारला खोटारडे संबोधत मोदी यांच्या पुतळ्याची उपहासात्मक पंचारती ओवाळत निदर्शने केली. नगर येथील दिल्लीगेट इथे काँग्रेसने केलेल्या या अनोख्या आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा आहे . भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून दिल्लीगेटला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

किरण काळे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत. केंद्र सरकारच्या ओबीसी जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात आम्ही आंदोलन करत जनतेसमोर सत्य मांडण्याचे काम केले आहे ‘.

पुढे किरण काळे म्हणाले , ‘ आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशा-यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी विरोधात दिशाभूल करणारे ढोंगी आंदोलन करण्याऐवजी भाजप नेत्यांनी त्यांच्याच नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनाच याबाबतीत जाब विचारावा,’

आंदोलनाच्या वेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, काँग्रेस नेते फारुक शेख, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विरेंद्र ठोंबरे सहभागी झाले होते.

… नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन , देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सरकारविरोधात आज रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय, पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असे मोठे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही. आम्ही काढलेला अध्यादेश या सरकारनं लॅप्स केला. महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला. काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण सुरु आहे. मग, केवळ महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण का रद्द झालं, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राष्ट्रवादीकडून देखील जोरदार प्रहार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपच्या ओबीसी आरक्षणासाठीच्या चक्काजाम आंदोलनावर टीका केली आहे. राज्य भरातील ओबीसी नेतृत्त्व ठरवून मोडीत काढणारा भाजप आज ओबीसी आरक्षणसाठी आंदोलन करत आहे. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली, अशा शब्दात जयंत पाटील यांनी महाराष्ट्र भाजपवर टीका केली आहे.

जयंत पाटील यांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांवर टीका करताना “राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली”, असा टोला लगावला आहे. जयंत पाटील यांनी यानिमित्तानं विधानसभा निवडणुकीत भाजपनं ओबीसी नेत्यांना नाकारण्यात आलेल्या तिकिटांच्या प्रकरणाकडे लक्ष वेधलं आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाजपनं तिकीट कापलं होतं, त्याकडे लक्ष वेधलं आहे. जयंत पाटील यांच्या या ट्विटचा रोख माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं दिसत आहे .

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला. ते आंदोलन करताना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना, आजचे भाजपाचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद आहे. फक्त राजकारण करण्यासाठी हे आंदोलन आहे. आरक्षण ओबीसी समाजाला मिळायलाच हवं यात कोणाचेही दुमत नाही, फक्त यात राजकारण करू नका, असंही रोहिणी खडसे म्हणाल्या.


शेअर करा