पतीच्या जागी नोकरी मिळवण्यासाठी बायकोने केला असा मास्टरप्लॅन , पोलिसही हैराण

शेअर करा

वटपौर्णिमेनिमित्त पतीला वाचवणाऱ्या सावित्रीच्या कथेला उजाळा मिळाला. समाजातल्या अनेक सावित्रींच्या कथा वृत्तपत्रं, सोशल मीडियावर झळकल्या. त्याचवेळी झारखंडमधल्या एका ‘सावित्री’नं नोकरीच्या लालसेपोटी नवऱ्याचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आली. या पत्नीनं आपल्या प्रियकरालाच आपल्या पतीला ठार मारण्यासाठी तीन लाख रुपयांची सुपारी दिली होती. घटनेत नोकरी हा मुद्दा दुय्यम असून विवाहबाह्य संबंधातून हा खून झाला असल्याचा यंत्रणेचा अंदाज आहे .

रामगड जिल्ह्यातल्या बडकाकाना रेल्वे पोलिसांनी ही खुनाची घटना उघडकीस आणली. मृत रवींद्र सिंह हा रेल्वेचा कर्मचारी होता. त्याची पत्नी मीरा देवी हिचे दोन वर्षांपासून संदीप नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. रवींद्र सिंह याला त्याची खबर लागताच मीरा देवी हिनं पतीला आपल्या मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या प्रियकरासमवेत पतीच्या हत्येचा कट रचला. पतीच्या मृत्यूनंतर आपल्याला पतीच्या जागेत रेल्वेत सरकारी नोकरी मिळेल आणि आपण प्रियकरासोबत मजेत आयुष्य घालवू अशी तिची योजना होती. पण मीरादेवी आणि तिच्या प्रियकराचं कट कारस्थान उघडकीस आलं.

बडकाकाना पोलीस ठाण्याचे प्रभारी मंगलदेव ओराओं म्हणाले, की मीरा देवीनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं आपला पती रवींद्र सिंह याची हत्या केली. त्यासाठी तिनं प्रियकर संदीप यालाच 3 लाखांची सुपारी दिली होती आणि अ‍ॅडव्हान्स म्हणून 1500 रुपये दिले होते. पतीची नोकरी मिळवून प्रियकराबरोबर मजेत राहण्याच्या उद्देशानं पत्नीनंच ही हत्या घडवून आणली असून, यामध्ये मीरा देवीचा प्रियकर संदीप याचा मित्र रोशन याचाही सहभाग होता. या सर्वांना पकडण्यात आलं आहे. खुनासाठीच्या तीन लाखांच्या सुपारीपोटी फक्त १५०० रुपये ऍडव्हान्स मिळूनही तो तयार होण्यामागे विवाहबाह्य संबंध हेच कारण असल्याचे चौकशीत आढळून आले आहे .

असा केला खून मात्र ..

संदीपचा मित्र रोशन यानं रवींद्र सिंह यांना पार्टी करण्यासाठी बोलावलं. त्यावेळी संदीपही तिथं होता. तिघांनी भरपूर मद्यपान केलं. त्यानंतर तिघंही मोटरसायकल वरून रेल्वे मैदानावर फेऱ्या मारत होते. नंतर ते डिझेल शेडजवळच्या निर्जन, कच्च्या रस्त्याकडे गेले. तिथं तिघंही लघुशंकेसाठी थांबले. त्यानंतर जेव्हा रवींद्र सिंह मोटरसायकलवर बसायला गेले, तेव्हा संदीपनं त्याचा गळा वायरनं आवळला आणि त्याला ठार केलं. नंतर दगडानं त्याचा चेहरा ठेचला आणि मृतदेह झुडपात फेकून दोघे निघून गेले.

रवींद्र सिंहचा मृतदेह मिळाल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. तेव्हा त्याचे कॉल डिटेल्स तपासताना पोलिसांना रोशनचं नाव कळलं. त्यावरून तंत्रज्ञान विभागाच्या मदतीनं पोलिसांनी रोशनचा ठावठिकाणा शोधला आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानं सगळं खरं सांगून टाकलं आणि या खुनाचं रहस्य उलगडलं. पोलिसांनी रवींद्र सिंहच्या पत्नीसह तीन आरोपींना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे .


शेअर करा